निवडणूक आयोगाच्या पेजवर भाजपची घुसखोरी
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणूक 2019 च्यावेळी Maharashtra Assembly Election 2019 भारतीय निवडणूक आयोगाचेElection Commission of India सोशल मीडिया वरील फेसबुक पेज हाताळणारी कंपनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकार्याची होती. संबंधित व्यक्ती भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचा राष्ट्रीय संयोजक होता असा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने निष्पक्ष संस्था म्हणून काम करणे अपेक्षित आहे.परंतु सदर प्रकार लोकशाहीमधील मुलभूत तत्त्वांना धक्का पोहचवणारा असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या प्रकरणी आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकार्यांनी फेसबुकवर निवडणुकी संदर्भात जनजागृती करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र या नावाने पेज सुरु केले होते. या पेजवर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक संदर्भात अनेक जाहिराती देण्यात आल्या होत्या. सदर पेज तयार करताना वापरकर्त्याने पुढील पत्ता दिला होता. 202 प्रेसमन हाऊस, विलेपार्ले, मुंबई. हा पत्ता कोणाचा आहे याबाबत शोध घेतला असता फडणवीस सरकारने सरकारच्या प्रसिद्धीच्या जाहिरातीचे काम साईनपोस्ट इंडिया नावाच्या एका जाहिरात कंपनीस दिले होते. त्या साईन पोस्ट कंपनीचा असल्याचे निष्पन्न झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले. हाच पत्ता सोशल सेंट्रल नावाच्या डिजिटल एजन्सीद्वारे देखील वापरला गेला आहे. ही कंपनी देवांग दवे याच्या नावावर असून तो भाजपच्या यूथ विंगच्या आयटी आणि सोशल मीडियाचा राष्ट्रीय संयोजक आहे. देवांग दवेच्या वेबसाइटवर त्याच्या कंपनीच्या ग्राहकांची यादी आहे. त्यानुसार त्याची कंपनी द फियरलेस इंडियन, सपोर्ट नरेंद्र मोदीं इत्यादी पेजेसची फाउंडर असल्याचे समोर येते. ही पेजेस भाजपाचा प्रचार करणारी असून विरोधी विचारसरणीच्या लोकांबद्दल या पेजेसवरून द्वेष पसरवला जातो. त्याशिवाय इतरही काही सरकारी विभागांचे काम त्याच्या एजन्सीकडून केले असल्याचे त्याच्या वेबसाईटवरून समोर येते असेही चव्हाण यानी यावेळी सांगितले.
घटनेच्या कलम 324 अनुसार निवडणुकांबाबतचे अधीक्षण, निर्देशन व नियंत्रण हे निवडणूक आयोगाकडे आहे. निवडणूका निष्पक्ष आणि निर्धोक वातावरणात पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. परंतु वरील घटनेवरून असे निदर्शनास येत आहे की महाराष्ट्र निवडणूक आयोग आपले कर्तव्य पार पाडण्यास कमी पडत आहे. या घटनेची तातडीने सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणी चव्हाण यांनीदेशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून केली आहे असे चव्हाण म्हणाले.
Post a Comment