सरकारी कोविड सेंटरपेक्षा मराठी शाळांची सुविधा उत्तम
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - ‘सरकारी कोविड सेंटरपेक्षा आमच्या गावातील मराठी शाळा किती तरी चांगली आहे. सुविधा नसलेल्या ठिकाणी रुग्णांना दाखल करून उपचारांचा फार्स होणार असेल तर आम्ही गावातील रुग्णांना गावातल्या शाळेत आणून येथेच कोविड सेंटर तयार करू,’ अशी भूमिका आदर्श गाव राळेगणसिद्धीच्या ग्रामस्थांनी घेतली आहे.
करोनावरील उपचारांसंबंधी शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत विविध तक्रारी सुरू आहेत. त्यात आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जागरुक आणि आदर्श अशी ओळख असलेल्या राळेगणसिद्धी गावाचाही समावेश झाला आहे. एवढे दिवस काटेकोर काळजी घेतल्यानंतरही गावातील एकाला मुंबईला जावे लागले. येताना तो गावात करोनाचा प्रसाद घेऊन आला, आणि त्यांचे सहा जणांचे कुटुंब बाधित झाले. त्यांना आता पारनेरला एका वसतिगृहात तयार करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. इकडे गावात विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी ग्रामस्थ कामाला लागले आहेत. स्वत: हजारे यांना यापासून दूर ठेवण्याचा अटोकाट प्रयत्न सुरू आहे. अशातच पारनेरच्या कोविड सेंटरमध्ये ठेवलेल्या रुग्णांच हाल होत असल्याची माहिती गावात समजली. त्यामुळे संताप व्यक्त होऊ लागला आहे.
यासंबंधी माहिती देताना माजी उपसरपंच लाभेश औटी यांनी सांगितले की, ‘मोठ्या दिमाखात पारनेरच्या कोविड सेंटरचे उद्घाटन झाले. प्रत्यक्षात तेथे मूलभूत सुविधाही नाहीत. आमच्या गावच्या लोकांचे तेथे हाल सुरू आहेत. बाकीचे उपचार किती आणि कसे होतात, हे दूरच पण जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टीही मिळणे कठीण झाले आहे. पाणी नसल्याने नातेवाईकांनी पिण्यासाठी म्हणून आणलेले पाणीच राखून ठेवून इतर कारणांसाठी वापरत आहेत. सफाई तर अजिबात नाही. अशा अस्वच्छ वातावरणात रुग्ण बरे होण्याऐवजी दुसरे आजार होण्याचीच शक्यता अधिक. इकडे गावातही पोलिस वगळता दुसरे अधिकारी फिरकले नाहीत. आरोग्य अधिकारी आले नाहीत. सगळ्या गोष्टी ग्राम समितीवर सोडून मोकळे झाले आहेत. केवळ पत्रे ठोकून रस्ते बंद करणे हा उपाय होऊ शकत नाही. त्याचा किती उपयोग होणार आणि काय गैरसोय होणार, याचाही विचार केला पाहिजे. मुळात चाचण्या घेणे आणि त्यांचे अहवाल वेळेत देणे याचेही गांभीर्य आरोग्य यंत्रणेला नाही. सरकारी लॅबमध्ये अहवाल येण्यास विलंब लागतो. खासगीचे अहवाल लवकर येतात, पण त्यात जास्त प्रमाण पॉझिटीव्हचेच कसे असते, हाही प्रश्न आहे. दुसरीकडे खासगीतून अहवाल आल्यानंतर रुग्णांची व्यवस्था करणे, त्यांचे संपर्क तपासून उपायोजना करणे यात सरकारी यंत्रणा तत्परता दाखवत नसल्याचे दिसून येते.’
यासंबंधी हजारे यांची भूमिका काय आहे, त्यांना या गोष्टी सांगितल्या का, असे विचारले असता औटी यांनी सांगितले की, ‘आम्हाला अण्णांची काळजी वाटते. त्यामुळे सध्या आम्ही गावकरी त्यांच्याकडे जाणे टाळत आहोत. त्यांना फोनवर याची माहिती दिली आहे. आता यासाठी आम्ही ग्रामस्थांनीच पुढाकार घेण्याचे ठरविले आहे. जर कोविड सेंटरमध्ये सुधारणा होणार नसेल तर आम्ही आमच्या गावाचे रुग्ण पुन्हा गावात घेऊन येणार आहोत. येथे आमच्या गावातील मराठी शाळेत त्यांची व्यवस्था करून येथेच उपचाराची सोय करू. गरीब कुटुंबांना खासगीत उपचार घेणे परवडत नाही. सरकारी ठिकाणी उपचारापेक्षा हाल आणि गैरसोयच जास्त होणार असेल तर आम्ही गावकऱ्यांनाच आता अत्मनिर्भर होत आपल्या गावकऱ्यांची काळजी घेण्याचे ठरविले आहे. करोना योद्धा म्हणून यंत्रणेचे खूप कौतूक करून झाले. लोकप्रतिनिधींचेही फार्स पाहून झाले, आता कोणाकडून काही अपेक्षा करण्यात अर्थ उरला नाही, असे आम्हा गावकऱ्यांचे मत बनले आहे.’
Post a Comment