माय अहमदनगर वेब टीम
वॉशिंग्टन: करोनाच्या संसर्गाने जगभरात थैमान घातले असून बाधितांसह मृतांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. करोना संसर्गाचे केंद्र अमेरिकेहून दक्षिण अमेरिकेत सरकले असल्याची परिस्थिती आहे. दक्षिण अमेरिकेत ब्राझीलनंतर आता मेक्सिकोमध्ये सर्वाधिक मृतांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे अमेरिका, ब्राझीलनंतर आता मेक्सिकोमध्ये सर्वाधिक करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.मेक्सिकोमधील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी ६८८ करोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. मेक्सिकोत आता करोनामुळे प्राण गमावलेल्यांची संख्या ४६ हजार ६८८ झाली आहे. अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, मेक्सिकोमधील मृतांची संख्या ही ब्रिटनमधील मृतांपेक्षा अधिक झाली आहे. ब्रिटनमध्ये करोनाच्या संसर्गामुळे ४६ हजार ११९ जणांचा मृत्यू झाला आहे. करोनामुळे सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झाले असून मृतांची संख्या एक लाख ५५ हजारांवर पोहचली आहे. तर, ४७ लाख अमेरिकन नागरिकांना करोनाची बाधा झाली आहे. ब्राझीलमध्ये २६ लाख नागरिकांना करोनाची बाधा झाली असून मृतांची संख्या ९२ हजारांवर पोहचली आहे. मेक्सिकोमध्ये चार लाख २४ हजारजणांना करोनाची बाधा झाली आहे. तर, भारत करोनाबाधितांच्या संख्येत तिसऱ्या स्थानी आहे. भारतात १७ लाख नागरिकांना करोनाची बाधा झाली असून ३६ हजार ६६२ जणांचा मृत्यू झाला आहे.
व्हिएतनाममध्ये सलग ९९ दिवस करोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता. मात्र, त्यानंतर करोनाबाधित आढळले असून १०० जणांवर उपचार सुरू आहेत. तर, तीन जणांचा मृत्यू झाला आहे. व्हिएतनामने आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय ३१ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलला आहे. मात्र, अमेरिका, युरोप आणि पश्चिम आशियातील आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांच्या विशेष उड्डाणांना परवानगी देण्यात आली आहे. या विशेष उड्डाणांमधून व्हिएतनाममध्ये अडकलेल्या परदेशी नागरिकांना मायदेशी नेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
जगभरात करोनाबाधितांची संख्या एक कोटी ७८ लाख झाली असून सहा लाख ८३ हजारजणांचा मृ्त्यू झाला आहे. तर, एक कोटी ११ लाखजणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. अमेरिकेत २३ लाख २८ हजार, ब्राझीलमध्ये १८ लाख ८४ हजार आणि भारतात ११ लाख करोनाबाधितांनी आजाराला मात दिली आहे.
Post a Comment