तोट्यातील दूध धंद्याकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष : प्रा.भानुदास बेरड
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : गेल्या दीड वर्षांपासून राज्यातील शेतकर्यांच्या दुधाला अपेक्षित भाव मिळत नाही. गायीच्या दुधाला फक्त 17 ते 18 रुपये प्रतिलिटर दर मिळत आहे. उत्पादन खर्चाचा विचार केला तर सध्या दुधाला 35 ते 40 रुपये दर मिळणे अपेक्षित आहे. दुर्देवाने राज्यातील महाविकास आघाडीने संकटात सापडलेल्या दूध धंद्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. यासाठी भाजपने राज्यव्यापी दुध दरवाढ महाएल्गार आंदोलन हाती घेतले आहे. नगर तालुक्यातही भाजप शेतकर्यांच्या गोठ्यात जावून त्यांच्याशी संवाद साधून व्यथा जाणून घेत आहे. या माध्यमातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना शेतकर्यांची पत्रे पाठविण्यात येत आहेत. गायीच्या दुधाला 10 रुपये प्रतिलिटर दरवाढ मिळावी, दुध भुकटीसाठी 50 रुपये अनुदान मिळावे या मागणीसाठी भाजप नगर तालुक्यात मोठी जागृती करणार असून पत्र आंदोलनाची दखल न घेतल्यास राज्य सरकारविरोधात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा.भानुदास बेरड यांनी दिला आहे.
भाजपच्या राज्यव्यापी दूध आंदोलनाअंतर्गत भाजपने नगर तालुक्यात शेतकर्यांच्या गोठ्यावर जावून दरवाढीचे मागणी करणारे पत्र लिहून घेणे सुरु केले आहे. आज वडगाव गुप्ता (ता.नगर) येथे भाजपने शेतकर्यांच्या भेटीगाठी घेवून दूधाच्या दराबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्याच्या नावे शेतकर्यांची पत्रे घेवून ती पोस्ट कार्यालयात टाकण्यात आली. यावेळी भाजपचे नगर तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे, जिल्हा उपाध्यक्ष शामराव पिंपळे, उमेश डोंगरे, सरपंच विजय शेवाळे, गोरख शेवाळे, बाबासाहेब शेवाळे, नाना कराळे, गोवर्धन शेवाळे, सागर भोपे, नाना डोंगरे, रमेश ढेपे, तुकाराम कराळे, दीपक गव्हाणे, बाबासाहेब गव्हाणे, हुसेन सय्यद आदी उपस्थित होते.
मनोज कोकाटे म्हणाले की, आताच्या परिस्थितीत दूध धंदा करणे शेतकर्यांसाठी कठिण बनले आहे. पेंडी, चारा, वालीस खूप महागले आहे. गायीच्या दुधाला 17 ते 18 रुपये दर मिळतो. त्यामुळे मिळणारे उत्पन्न खुराकावरच खर्च होत आहे. शेतकर्याच्या हातात काहीच पैसे राहत नाहीत. शेतकर्याचे आर्थिक गणित बिघडत चालले असून सरकारने गायीच्या दुधाला किमान 30 रुपये प्रतिलिटर दर देणे आवश्यक आहे. नगर तालुक्यातून 5 हजार पत्रे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविण्यात येणार असून या पत्राचीही दखल घेतली न गेल्यास आक्रमक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कोकाटे यांनी दिला.
Post a Comment