माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - जीवनात होणारी हेळसांड, अपमान याबद्दल आक्रमक पवित्रा घेत अन्यायाविरुध्द संघर्ष करता येतो. परंतू ज्याचा मृत्युनंतरही हा अन्याय, अपमान थांबत नाही, त्याचं काय? अहमदनगरमध्ये मात्र मृत्युनंतरही पार्थिव शरिराची हेळसांड थांबायला तयार नाही. कोरोना आजाराने ज्यांचा बळी घेतला अशा एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल २५ पार्थिवांवर घाईगडबडीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. अहमदनगरचे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, माजी महापौर अभिषेक कळमकर, मनपाचे विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे आदींनी अहमदनगरच्या अमरधामला भेट दिली. त्यावेळी हे जळजळीत वास्तव समोर आलं.
यासंदर्भात माजी महापौर अभिषेक कळमकर म्हणाले, मृृत्युनंतरची पार्थिवांची ही हेळसांड सुरु आहे, त्या परिस्थितीला पूर्णत: मनपाचा आरोग्यविभाग, त्या विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत. वेळोवेळी या समस्येप्रकरणी मनपा प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र प्रशासनाने ही बाब गांभिर्याने घेतली नाही. यासाठी शिवसेनेचे शहर प्रमुख, ज्येष्ठ नगरसेवक शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचं याकडे लक्ष वेधणार आहे.
यासंदर्भात मनपाचे विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे म्हणाले, अमरधाममध्ये कोरोनामुळे मयत झालेल्या रुग्णांच्या २५ मृतदेहांवर एकाचवेळी अग्निसंस्कार केले जातात. मात्र अशावेळी ज्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला, अशा मयत नागरिकांच्या पार्थिवांवर अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांना ताटकळत बसून रहावे लागते. यासाठी अमरधाममधली दुसरी विद्युत दाहिनी सुरु केल्यास एकाचवेळी २० मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जाऊ शकतात. त्यामुळे यासंदर्भात मनपा आयुक्तांना निवेदन देणार आहोत. यामध्ये मनपाने सुधारणा केली नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाणार आहे.
Post a Comment