गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत बदलाची मागणी

 


माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - मागील काही वर्षांपासून बॅकफूटवर गेलेल्या काँग्रेसमध्ये फेरबदलाची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांच्या निवडीला वर्ष झाले असून, काँग्रेसमधील २३ वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पक्षाला उभारी देण्यासंदर्भात पत्र लिहिले आहे. काँग्रेस अध्यक्षांच्या निवडीसह पक्षामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत फेरबदल करण्याची मागणीही या नेत्यांनी केली आहे.

सत्तातून पायउतार झाल्याच्या सहा वर्षांनंतर काँग्रेसमध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहेत. मागील वर्षभरापासून पूर्णवेळ नेतृत्वाशिवाय असलेल्या काँग्रेसमध्ये आता अध्यक्षांच्या निवडीची मागणी होऊ लागली आहे. पक्षामध्ये आमुलाग्र बदल करण्याविषयी काँग्रेसच्या पाच माजी मुख्यमंत्र्यांसह २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे. भाजपा राजकीय आघाडीवर पुढे असून, निर्णायक असलेल्या देशातील तरुण मतदारांनी नरेंद्र मोदी यांना मतदान केलं असल्याचा मुद्दा काँग्रेस नेत्यांनी नमूद केला आहे. तरुणांचा काँग्रेसवरून विश्वास कमी होणं ही चिंतेची बाब असल्याचंही म्हटलं आहे.

काँग्रेस पक्षामध्ये बदल करण्याची मागणी करणारं हे पत्र १५ दिवसांपूर्वी देण्यात आलं आहे. या पत्रामध्ये या नेत्यांनी पक्षाच्या नेतृत्वाचा मुद्दा उपस्थित केला असून, पक्षाच्या अध्यक्षपदी पूर्णवेळ प्रभावी व लोकांमध्ये सक्रिय असलेल्या नेत्याची निवड करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

काँग्रेस कार्यकारिणीच्या सोमवारी होत असलेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रावर काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी सडकून टीका केली आहे. हे पत्र म्हणजे राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाची धार बोथट करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप निरुपम यांनी केला. आतापर्यंत बंद खोलीत रचले जाणारे षडयंत्र या पत्रामुळे समोर आले आहे. याला केवळ एकच उत्तर आहे. राहुल गांधी यांनी अध्यक्षपद न स्वीकारण्याचा हट्ट सोडून द्यावा आणि विविध राज्यांमध्ये काँग्रेसची सुरु असलेली पडझड थांबवावी. काँग्रेसला केवळ तेच वाचवू शकतात, असे संजय निरुपम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post