प्रणव मुखर्जी यांची प्रकृती चिंतजनक, अद्याप व्हेंटिलेटरवर

 

माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली - माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांना जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. अद्यापही ते व्हेंटिलेटरवरच असल्याचे आर्मीच्या रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.

‘सध्या त्यांच्या हृदयाची गती नियमित आहे आणि ते व्हेंटिलेटरवर आहेत’ असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. मंगळवारी रात्रीपर्यंत त्यांना व्हेंटिलेटरवरच ठेवण्यात आले होते. त्यानंतरही त्यांच्या तब्येतीत विशेष असा सुधार झाला नसल्यामुळे त्यांना अजूनही व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

या दरम्यान प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी एक भावनिक संदेश ट्विटरवर पोस्ट केला आहे. ‘गेल्या वर्षी ८ ऑगस्ट हा दिवस माज्यासाठी खूप आनंदी होता. कारण त्या दिवशी माझ्या वडिलांना देशाचा सर्वोच्च असणारा भारत रत्न पुरस्कार मिळाला होता आणि बरोबर एक वर्षानंतर १० ऑगस्टला माझे वडील गंभीररीत्या आजारी पडले आहेत. देवाने त्यांच्यासाठी जे काही चांगले असेल ते करावे आणि मला एकाच वेळी सुखदु:ख हे दोन्ही स्वीकारण्याची क्षमता द्यावी. तसेच मी सर्वांचे या क्षणी आभार व्यक्त करते,’ अशा आशयाचे भावनिक ट्विट त्यांनी पोस्ट केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post