माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी कृषी पायाभूत सुविधा निधीअंतर्गत आर्थिक योजनांबाबत महत्वाची घोषणा केली. पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यामातून पंतप्रधान शेतकरी योजनेच्या विविध योजनांची घोषणा केली. या बरोबरच पंतप्रधानांनी आपल्या व्हर्च्युअल कार्यक्रमात कृषी पायाभूत सुविधा फंडांतर्गत साडे आठ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना १७ हजार कोटी रुपये वितरित केले.
आज लहषष्टी असून भगवान बलराम जयंती आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना, विशेषत: शेतकऱ्यांना हलछठ आणि दाऊ जन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. हलषष्टी आणि भगवान बलराम जयंतीचे निमित्त साधत पंतप्रधान मोदी यांनी कृषीशी संबंधित सुविधा तयार करण्यासाठी एक लाख कोटी रुपयांचा विशेष निधी उभारण्याची घोषणा केली आहे.
देशातील साडे आठ कोटी शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यावर पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीच्या रुपात १७ हजार कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. या योजनेचे लक्ष्य आता गाठले जात असल्याचे पाहून आपल्याला आनंद होत असल्याचेही मोदी म्हणाले. गेल्या दीड वर्षांच्या काळात या योजनेअंतर्गत ७५ हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याचे मोदी म्हणाले. यांपैकी २२ कोटी रुपये करोनामुळे लॉकडाउन सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आले आहेत, असेही मोदी म्हणाले.
या योजनेमुळे गावांमधील शेतकरी समूहांना, शेतकरी समित्यांना, FPO ना वेअरहाऊस बनवण्यासाठी, तसेच कोल्ड स्टोरेज तयार करण्यासाठी आणि फूड प्रोसेसिंगशी संबंधित लघु उद्योग सुरू करण्यासाठी १ लाख कोटी रुपयांची मदत मिळणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी योजनेचा शुभारंभ करताना म्हटले आहे. पूर्वी e-NAM द्वारे एक तंत्रज्ञान आधारित एक मोठी व्यवस्था बनवण्यात आली आहे. आता कायदा तयार करून शेतकऱ्यांना बाजाराच्या तसेचे बाजार कराच्या कक्षेतून मुक्त करण्यात आले आहे.
Post a Comment