मोदींचे 20 लाख कोटींचे पॅकेज म्हणजे मृगजळ!: सत्यजीत तांबे


 माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - अर्थव्यवस्थेत नोकरदार हा मोठा उपभोक्ता वर्ग असून मागणी जिवंत ठेवण्यासाठी तो अत्यंत महत्वाचा आहे. खा. राहुल गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरमहा थेट रक्कम देणे गरजेचे होते. सरकारने जर थेट आर्थिक मदत केली असती तर अर्थव्यवस्था मंदावली नसती. या परिस्थितीला मोदीच जबाबदार असून त्यांचे 20 लाख कोटींचे पॅकेज म्हणजे मृगजळ आहे, असा टोला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी लगावला आहे.

कहां गये वो 20 लाख करोड?  या सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या अनोख्या आंदोलनाच्या तीसऱ्या दिवशी युवक काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी कामगार व नोकरदार यांच्याशी संवाद साधत 20 लाख कोटींच्या पॅकेजबद्दल त्यांची मतं जाणून घेतली. नोकरदार वर्गाला काहीच मिळाले नसल्याने पॅकेजची खाजगी, कॉर्पोरेट क्षेत्र व कामगार वर्गात विशेष नाराजी असल्याचे समोर आले आहे. मोठ्या प्रमाणात नोकऱ्या गेल्या असून जे कामावर आहेत त्यांचे पगार थकले असल्याचे दिसून आले.

मोरॅटोरियम सवलत दिली असली तरी त्यावर व्याज आकारुन सूट दिली जात आहे त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. कॉर्पोरेट कंपन्यांना मोदींनी काही आर्थिक मदत केली असती तर कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ पोहचवला असता. पण मदत काहीच आलेली नाही. नोकरी उद्या राहते की नाही या भीतीत हे लोक जगत आहोत, पुढे काय ? अनिश्चितेची टांगती तलवार कायम डोक्यावर आहे. पंतप्रधानांची विश्वासार्हता संपली आहे अशी प्रतिक्रिया एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.

 

यावेळी युवक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला फोन करून आणि पत्र लिहून नोकरदार वर्गाच्या मागण्या समोर ठेवल्या आहेत. उद्या 20 लाख करोड रुपयांतुन बेरोजगार झालेल्या युवकांना काय मदत मिळाली? याची शहानिशा युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते करणार असून 14 तारखेला भाजप पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत त्यांना जाब विचारणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post