महामुंबईत पावसाचे लॉकडाऊन



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - मुंबई आणि उपनगरांना मंगळवारी पावसाने झोडपून काढले. मंगळवारी रात्रभर मुसळधार सुरू झालेला पाऊस बुधवारी जोरदार कोसळला. त्यामुळे सखल भागात सर्वत्र पाणी साचल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतूक कोलमडून गेली होती.  आधीच टाळेबंदी, त्यात पावसाचा मार यामुळे मुंबईकरांची मोठी दैना उडाली. पुढचे 48 तास हवामान विभागाने मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवला आहे. मुंबईत 15 वर्षांनंतर धुवाधार असा पाऊस बरसत आहे.  परळ, कुर्ला, वडाळा व सायन येथे रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे सकाळी 10 च्या सुमारास मध्य, पश्चिम व हार्बर हे तिन्ही लोकल मार्ग ठप्प झाले.
सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठीच लोकल सुरू आहे. त्यामुळे लोकल सेवा ठप्प होण्याचा फटका बसला नाही. मुसळधार पावसामुळे मंत्रालय तसेच उपनगरातील इतर शासकीय कार्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली होती. धुवाँधार झालेल्या पावसामुळे मुंबईतल्या 56 मार्गांवरील बेस्ट बसेसचे मार्ग वळवण्यात आले. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर व पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी शहरात फिरून आपत्कालीन व्यवस्थेचा आढावा घेतला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post