शिर्डी - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साईसमाधी मंदिराच्या तळघरात आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात पाणी झिरपत आहे. संस्थानच्या वतीने सदरचे पाणी बंद करण्यासाठी केमिकलचा वापर केला जात असून, अन्य उपाययोजनाही सुरू आहेत.
एका ठिकाणी पाणी बंद केले, तर दुसर्या ठिकाणाहून पाणी झिरपायला सुरुवात होते. हे पाणी कोठून येते, याचा अद्यापि शोध लागलेला नाही. संस्थानच्या वतीने हा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.
मागील आठवड्यापासून अचानक पाणी झिरपण्यास सुरुवात झाली आहे. 24 तासांत साधारणपणे 300 लिटरपेक्षा जास्त पाणी पाझरत आहे. झिरपणारे पाणी बंद करण्यासाठी ड्रिल मारून केमिकलच्या साह्याने मोठ्या शर्थीने प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु, एका ठिकाणावरून पाणी बंद करण्याचा प्रयत्न केल्यानंतर दुसर्या ठिकाणाहून पाणी झिरपायला सुरुवात होत असल्याने संस्थानच्या अधिकार्यांची डोकेदुखी वाढली आहे.
शेकडो वर्षांपासून बांधण्यात आलेल्या या श्रीमंत बुट्टी वाड्यातील तळघरात दैनंदिन पूजेच्या समयी वापरण्यात येणार्या साईबाबांची मौल्यवान आभूषणे, तसेच पूजेच्या वस्तू ठेवण्यात येत असतात. हे तळघर साई समाधीच्या डाव्या बाजूला असून, त्यावरूनच भाविकांची दर्शन रांग सुरू असते. पावसाचे पाणी पाझरत असावे, असा प्राथमिक अंदाज संस्थानच्या अधिकार्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, यापूर्वी अनेक मोठमोठे पावसाळे झाले, गोदावरी व अन्य नद्यांना पूर आले, लेंडी नाल्याला पूर आला होता, शहरातील अनेक भागांत पाणी साचले होते. त्यावेळी मात्र असा प्रकार कधीच पाहायला मिळाला नव्हता. मात्र, मार्चपासून लॉकडाऊन सुरू असल्याने मंदिर बंद आहे. सरासरी पर्जन्यवृष्टी झाली असताना ही परिस्थिती अचानकपणे कशी उद्भवू शकते, असा प्रश्न असून याबाबत ग्रामस्थांमध्ये तर्कवितर्क लढविले जात आहेत.
पाण्याचा पाझर थांबविण्यासाठी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता रघुनाथ आहेर, मंदिर प्रमुख रमेश चौधरी आदी प्रयत्नशील आहे.
Post a Comment