मुंबई - अभिनेता सुशांत राजपूतच्या आत्महत्येनंतर राज्यात चांगलीच राजकीय धुळवड रंगली आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी व्हावी अशी मागणी पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन केली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगल्याच भूवया उंचावल्या.
या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारण्यात आले असता त्यांनी पार्थ अपरिपक्व आहे. त्याच्या बोलण्याला मी कवडीचीही किंमत देत नाही अशी कडक प्रतिक्रिया दिली. पार्थ यांची आजोबांनी माध्यमांसमोर जाहीर कानउघडणी केल्याने मीडियात चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे कॅबिनेट बैठक सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक निवासस्थानी पोहोचले आहेत.
या बैठकीला जलसंपदा मंत्री जयंत पाटील सुद्धा उपस्थित आहेत. पार्थ यांची जाहीर कानउघडणी शरद पवार यांनी केली असली, तरी तो थेट इशारा अजित पवार यांना दिल्याची चर्चा सुरु झाली आहे. राम मंदिर भुमिपुजन झाल्यानंतर त्यांनी जय श्रीराम नारा दिल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळेच पार्थ यांच्याबद्दल शरद पवार यांनी कडक शब्दात संदेश देऊन कानउघडणी केली आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
Post a Comment