राज्याने ओलांडला ७ लाख कोरोना रुग्णांचा टप्पा

 

माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - राज्यात मंगळवारी 10 हजार 425 नव्या रुग्णांची भर पडल्याने कोरोनाबाधितांची संख्या 7 लाखांहून अधिक झाली. मुंबईत मात्र कोरोनाची पिछेहाट सुरू असून, मंगळवारी अवघ्या 587 नवीन रुग्णांची नोंद झाली. ठाण्यातही 789 नवे रुग्ण नोंदवले गेले. 


मुंबईतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 37 हजार 678 वर पोहोचली आहे. मंगळवारी दिवसभरात 35 जणांचा मृत्यू झाला असून 883 जण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 11 हजार 967  झाली आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या  7 हजार 474 वर पोहचली आहे. तर, हॉस्पिटलमध्ये आजही 17 हजार 931 रुग्ण उपचार घेत आहेत. मृतांमध्ये 27 जणांना दीर्घकालीन आजार होते.


ठाणे जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा कहर हळूहळू कमी होत आहे. येथे मंगळवारी 789 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. दुदैवाने कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यास आरोग्य यंत्रणेला अपयश येत आहे. गेल्या चोवीस तासांत तब्बल 47 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. ठाणे जिल्ह्यात 1 लाख 16 हजार 413 कोरोनाबाधितांपैकी एक लाख 877 रुग्णांनी कोरोनावर विजय मिळवला आहे. तसेच 12 हजार 189 रुग्ण उपचार घेत आहेत.


मंगळवारी राज्यात 329 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आजवर 23 हजारांहून अधिक नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.24 टक्के एवढा आहे. मंगळवारी राज्यात 12 हजार 300 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. आजवर राज्यातील एकूण 5 लाख 14 हजार 790 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. आज घडीला राज्यात एकूण 1 लाख 65 हजार 921 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 73.14 टक्के एवढे झाले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post