पद सोडायला तयार, नवीन अध्यक्ष शोधा; सोनिया गांधींचं काँग्रेस


माय अहमदनगर वेब टीम
दिल्ली -  काँग्रेसमधील २३ वरिष्ठ नेत्यांनी पूर्णवेळ अध्यक्ष आणि पक्षांमध्ये फेरबदल करण्यासंदर्भात पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना सविस्तर पत्र लिहिलं होतं. या पत्रामध्ये नेत्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदी कार्यक्षम व जनतेमध्ये सक्रिय असलेल्या नेत्याची निवड करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली असून, सोनिया गांधी यांनी पत्राला उत्तर दिलं आहे. पक्षाध्यक्ष पद सोडायला आपण तयार असून, एकत्र येऊन नवीन अध्यक्षांची निवड करा, असं सोनिया गांधी यांनी नेत्यांना म्हटलं आहे. त्यामुळे उद्या (२४ ऑगस्ट) होणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.
काँग्रेसच्या पाच माजी मुख्यमंत्र्यासह २३ नेत्यांनी पक्षाला नवी उभारी देण्यासाठी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं होतं. १५ दिवसांपूर्वी लिहिलेल्या पत्रात काही मुद्दे नेत्यांनी मांडले होते. या पत्राला सोनिया गांधी यांनी उत्तर दिलं आहे. “काँग्रेस कार्यकारी समितीनं १० ऑगस्टला पक्षाची सूत्रे स्वीकारण्याची विनंती केली होती. तेव्हा पुन्हा पक्षाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारण्यात रस नसल्याचं आपण समितीला सांगितलं होतं. त्याबरोबर हंगामी पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना लवकरात लवकर पक्षाध्यक्ष पदाची निवड करावी, अशी अटही घातली होती,” असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. “पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी सोडायला तयार असून, एकत्र येऊन नव्या अध्यक्षांची निवड करावी,” असं सोनिया गांधी यांनी काँग्रेस नेत्यांना म्हटलं आहे.
काय म्हणाले काँग्रेसचे नेते?
काँग्रेस पक्षामध्ये बदल करण्याची मागणी करणारं हे पत्र १५ दिवसांपूर्वी देण्यात आलं आहे. या पत्रामध्ये या नेत्यांनी पक्षाच्या नेतृत्वाचा मुद्दा उपस्थित केला असून, पक्षाच्या अध्यक्षपदी पूर्णवेळ प्रभावी व लोकांमध्ये सक्रिय असलेल्या नेत्याची निवड करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
“पक्षामध्ये व्यापक स्वरूपात सुधारणा करण्याबरोबरच, सत्तेचं विकेंद्रीकरण, राज्यांमधील पक्ष बळकटीकरण, प्रत्येक स्तरावर पक्षातंर्गत निवडणूका, केंद्रीय कार्यकारणीपासून ते स्थानिक पातळीपर्यंत निवडणुका आणि पक्षाच्या संसदीय मंडळासाठी तात्काळ घटना तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पक्षाच्या होत असलेल्या घसरणीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी पक्षांनं प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण केलं नाही,” असं या नेत्यांनी म्हटलं आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post