माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - फेसबुकवर जाहिरातीसाठी खर्च करणा-यांविषयी नवी आकडेवारी समोर आली आहे. यानुसार, मागील १८ महिन्यांमध्ये सत्ताधारी भाजपने फेसबुक जाहिरातीवर सर्वाधिक खर्च केला आहे. यात सामाजिक, राजकीय आणि निवडणूक प्रचार इत्यादी जाहिरातींचा समावेश आहे. फेब्रुवारी २०१९ पासून भाजपने फेसबुक जाहिरातीवर ४.६१ कोटी रुपये खर्च केले आहेत.
फेसबुकवर जाहिरातीसाठी खर्च करणा-यांच्या यादीत भाजपनंतर इतर पक्षांचंही नाव आहे. देशाचा सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसने फेसबुक जाहिरातीवर १.८४ कोटी रुपये खर्च केले आहेत. तर आम आदमी पक्षाने फेसबुक जाहिरातीवर ६९ लाख रुपयांचा खर्च केला आहे. सोशल मीडियावर जाहितीवर खर्च करणा-यांच्या माहितीचा अभ्यास करणा-या संस्थेने ही आकडेवारी जाहीर केली आहे. यावर २४ ऑगस्टपर्यंतचे आकडेवारी उपलब्ध आहे. आ आकडेवारीनुसार फेसबुक इंडियावर फेब्रुवारी २०१९ पासून ५९.६५ कोटी रुपये जाहिरातीवर खर्च करण्यात आले आहेत.
ऑनलाइन मीडिया रिपोर्ट्सनुसार, फेसबुकवर जाहिरातीवर खर्च करणारे टॉप १० पैकी ४ जाहिरातदार भाजपशी संबंधित आहेत. यामध्ये ३ जण असे आहेत ज्यांचा पत्ता भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयाचा आहे. या चार पैकी जाहिरात देणारे दोन जाहिरातदार कम्युनिटी पेज आहेत. ‘मेरा पहला वोट मोदी को’ आणि ‘भारत के मन की बात’ अशी या पेजची नावं आहेत. ‘मेरा पहला वोट मोदी’च्या जाहिरातीवर १.३९ कोटी रुपये आणि ‘भारत के मन की बात’च्या जाहिरातीवर २.२४ कोटी रुपए खर्च करण्यात आले आहेत.
न्यूज आणि मीडिया वेबसाईट या श्रेणीत असलेल्या नेशन वुईथ नमो पेजच्या जाहिरातीसाठी १.२८ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. याशिवाय माजी खासदार आणि भाजप नेते आर. के. सिन्हा यांच्याशी संबंधित एका पेजच्या जाहिरातीवर ६५ लाख रुपये खर्च करण्यात आल्याची बाबही या आकडेवारीत समोर आली आहे.
भाजपशी संबंधित या सर्व पेजच्या जाहिरातींची एकूण बेरीज केली तर हा खर्च १०.१७ कोटी रुपये इतका आहे. ही किंमत फेसबुकच्या टॉप १० जाहिरातदारांच्या एकूण वाट्यापैकी ६४ टक्के इतकी मोठी आहे. या जाहिरातींमध्ये एप्रिल-मे १०१९ च्या निवडणुकीत केलेल्या जाहिरातींचाही समावेश आहे. या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमतासह सत्तेत आली होती.
Post a Comment