माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील व्यवसाय सुरक्षित राहण्याच्या उद्देशाने कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील आडत व भुसार व्यापार्यांची नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील व्यवसाय सुरक्षिततेच्या उद्देशाने कमिटीने काही निर्णय घेवून 25 ऑगस्ट 2020 रोजी भुसार आडत व्यापार्यांनी लाक्षणिक बंद करण्याचे जाहीर केले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचा सेस आणि देखरेख खर्च व इतर अनेक छुपे खर्च कमी करण्याच्या किंवा रद्द करण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी भूसार व आडते व्यापार्यांनी 25 ऑगस्ट 2020 ला बंदची हाक दिली आहे. कॅमीट (उचखढ) चे अध्यक्ष मोहन गुरुनानी तसेच दि फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्सचे अध्यक्ष वालचंद संचेती यांचे अध्यक्षते खाली सोमवार दि.17 रोजी संपुर्ण महाराष्ट्रातील आडते व भुसार व्यापार्यांची ऑनलाईन मिटींग झाली. व्यापार्यांना येणार्या अडचणीबाबत व जाचक नियम अटी बाबत चर्चा करुन सरकारचे लक्ष वेधण्याचे दृष्टीने पहिल्या टप्प्यातील अंदोलनाची दिशा ठरल्याचे संघाचे सचिव मोहन कोकाटी यांनी सांगितले. केंद्र सरकारने देशात कोठेही शेतमाल विकण्याची मुभा दिली आहे. त्यास मार्केट कमीटीचे कोणतेही बंधन, नियम किंवा खर्च लागणार नाही. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती बाहेरील व्यापार वाढणार आहे.
तसेच सदर व्यवहारामध्ये परदेशी गुंतवणुक येणार आहे. व त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी त्यांचेशी स्पर्धा करु शकणार नाही, सरकारला बाजार समित्या टिकवण्याच्या असतील तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवारातील व्यापार्यांकडुन ठराविक वार्षिक शुल्क आकारावी जसे महानगरपालिका वार्षिक कर घेते व त्यातुन सेवा सुविधा देतात. तसे बाजार समितीमध्ये करावे. सेस, देखरेख चार्ज व इतर छुपे सर्व खर्च रद्द करावे. तरच येथील व्यापार व व्यापारी टिकतील नाहीतर येथील व्यापार संपेल आणि त्या पोठोपाठ व्यापारीही संपतील असे आवाहन श्री. राजेश शहा हयांनी केले. यावेळी झालेल्या निर्णयास अहमदनगर मधील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील व्यापारी आडते पांठीबा देऊन 25 ऑगस्ट रोजी आपला व्यापार बंद ठेवणार आहेत असे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चोपडा, उपाध्यक्ष राजेंद्र बोथरा, शांतीलाल गांधी, सेक्रेटरी संतोष बोरा, रविंद्र गुजराथी, गोपाल मिनीयार यांनी कळविले आहे.
Post a Comment