सर्वसामान्यांसाठी अविरत लढणारा योध्दा गमावला – अभिषेक कळमकर


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – शहर व जिल्ह्यात शिवसेनेचा चेहरा असलेले शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचे निधन सर्वांसाठीच खूप धक्कादायक आहे. रोज त्यांच्या संपर्कात असल्याने ते असे सर्वांना सोडून जातील असे कधीच वाटले नाही. गोरगरीबांसाठी, सर्वसामान्यांसाठी लढणारे ते एक योध्दा होते. आताच्या कोरोनाकाळात लॉकडाऊनमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने गरजूंना प्रचंड अशी मदत केली. कोरोनाचे संकट आपल्या नगरमधून लवकरच हद्दपार होईल, तोपर्यंत आपण सामान्यांना आधार दिला पाहिजे, कोणीही उपाशीपोटी राहिला नाही पाहिजे अशा भूमिकेतून ते सतत कार्यमग्न होते, अशी भावना माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले, मी शिवसेनेत प्रवेश केल्यापासून त्यांच्या सान्निध्यात रहायची संधी मला मिळाली. शिवसैनिकांना ते अक्षरश: पोटच्या मुलाप्रमाणे जपायचे. समाजकारण, राजकारणाचे धडे द्यायचे. आपली निष्ठा ही कायम पक्ष व सामान्य जनतेशी कायम राखली पाहिजे. लोकांमुळे आपण आहोत हे कधीही विसरायचे नाही, अशी शिकवण ते कायम द्यायचे. नगरमध्ये मी स्वत: त्यांचा झंझावात लहान असल्यापासून पाहत आहे. हिंदुत्त्ववाद हा त्यांच्यासाठी श्वास होता. संघर्ष करताना ते निधड्या छातीने कोणत्याही प्रसंगांना सामोरे जायचे. सामान्य माणूस काम घेवून आल्यावर त्याची अडचण दूर करेपर्यंत स्वस्थ बसून राहणे त्यांना मान्य नसे. राम मंदिर आंदोलनाशी ते सुरुवातीपासून जोडले गेलेले होते.

सुप्रिम कोर्टाने जेव्हा राम मंदिर प्रकरणाचा निकाल दिला तेव्हा त्यांना प्रचंड आनंद झाला होता. आपल्या डोळ्यादेखत अयोध्येत श्रीराम मंदिराचे निर्माण सुरु होईल, याचा त्यांना खूप आनंद होता. आताही राम मंदिर निर्माण भूमीपूजनाची तारीख जाहीर झाल्यापासून तो सोहळा दूरचित्रवाणीवर पाहण्याचे त्यांनी ठरवले होते. यादिवसासाठी ते खूपच उत्साही व उत्सुक होते. दुर्देवाने हा सोहळा सुरु होण्याच्या काही तास अगोदरच त्यांनी जगाचा निरोप घेतला. जणू काही प्रभू रामचंद्रांनी त्यांना प्रत्यक्ष दर्शन देण्यासाठीच आपल्याकडे बोलावून घेतले. सर्वसामान्य माणूस हा त्यांच्या समाजकारण, राजकारणाच्या कायम केंद्रस्थानी राहिला आहे. कोणाही गोरगरीबावर, सर्वसामान्यांवर अन्याय होणार नाही यासाठी ते कायम दक्ष राहिले. एखाद्या वाघाप्रमाणे अन्यायकर्त्यावर झडप घालून ते सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यायचे. त्यांचा हाच वारसा तमाम शिवसैनिक पुढे कायम ठेवतील असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त करून अनिल राठोड यांना श्रध्दांजली अर्पण करतो.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post