माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - कोरोनामुळे अनेक सण उत्सव साजरे करण्यावर बंधन आली असून, मोहरमनिमित्त काढण्यात येणा-या मिरवणुकीलाही सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. याचिकाकर्त्यांनी मोहरम मिरवणूक काढण्यासाठी परवानगी देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने जनतेच्या आरोग्याबद्दल धोका घेऊ शकत नाही, असे सांगत मागणी फेटाळून लावली. त्याचबरोबर एखाद्या ठिकाणी मिरवणूक काढण्याच्या मागणीचा विचार केला जाईल, असे सांगत याचिकाकर्त्यांना अलाहाबाद उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले.
कोरोनामुळे देशभरात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक वार्षिक कार्यक्रमांबरोबर धार्मिक सण उत्सवांवरही सरकारकडून कोरोना प्रसाराचा धोका लक्षात घेऊन बंधने आणण्यात आली आहेत. दरम्यान, मोहरम मिरवणूक काढण्यास परवानगी देण्याची मागणी करणारी याचिका लखनौ येथील याचिकाकर्त्यांने केली होती.
या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंठपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावत देशभरात मोहरम मिरवणुका काढण्यास नकार दिला. न्यायालय म्हणाले, ‘जर आम्ही मोहरम मिरवणूक काढण्यास परवानगी दिली तर गोंधळ होईल आणि एका विशिष्ट समुदायाला कोरोनाचा प्रसार केला म्हणून लक्ष्य केले जाईल. आम्हाला ते नको आहे,’ असे न्यायालयाने स्पष्ट केले.
‘एक न्यायालय म्हणून आम्ही जनतेच्या आरोग्याबद्दल धोका पत्करू शकत नाही. जर तुम्ही एखाद्या विशिष्ट ठिकाणी मिरवणूक काढण्याची मागणी केली, तर आम्ही उद्भवणा-या धोक्याचा विचार केला असता,’ न्यायालयाने सांगितले.
त्यावर ‘शिया समुदायातील बहुसंख्य लोक लखनौमध्ये वास्तव्याला आहेत, त्यामुळे केवळ लखनौसाठी परवानगी मिळेल का,’ अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली. याप्रकरणी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना अलहाबाद न्यायालयात जाण्यास सांगितले आहे. या प्रकरणामध्ये राज्यांनीही कोणतीही भूमिका घेतली नसल्याचे न्यायालयाने लक्षात घेतले.
Post a Comment