माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी अनेक दिवसांनी पुन्हा एकदा राफेल लढाऊ विमानांच्या मुद्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी ट्वीट करत राफेल लढाऊ विमानांसाठी भारताच्या खजिन्यातून पैसे चोरल्याचा गंभीर आरोप केला आहे.
राहुल गांधी यांनी एका वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताचा दाखला दिला आहे. या वृत्तामध्ये संरक्षण मंत्रालयाने राफेल लढाऊ विमान कराराशी संबंधित कोणतीही माहिती कॅगला देण्यास नकार दिल्याचे म्हटले आहे. या वृत्तावरूनच राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. 'सत्य एक आहे, मार्ग बरेच आहेत' या महात्मा गांधींच्या विधानाची आठवणही त्यांनी करून दिली आहे.
५९ हजार कोटी रुपयांमध्ये ३६ लढाऊ विमानांच्या खरेदी प्रकरणात न्यायालयाच्या देखरेखेखाली चौकशी व्हावी याची जनहित याचिका डिसेंबर २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती. तसेच या प्रकरणात काहीच चूकीचे नाही असे म्हटले होते.
कॉंग्रेसने राफेल मुद्यावरूनच २०१९ ची लोकसभा निवडणूक लढविली. त्यावेळी निवडणूक प्रचारात तत्कालीन कॉग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक लोकांवर राफेल करारावरून निशाणा साधला होता. तसेच या करारात मोठा भ्रष्टाचार झाल्याचाही टीका केली होती. त्यांनी या प्रकरणात अनेक राजकारणी आणि उद्योजकांची नावे गुंतल्याचा आरोप केला होता. राहुल गांधी यांनी असा दावा केला होता की स्वत: फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्सोइस ओलांडे यांनी त्यांना या प्रकरणाशी संबंधित महत्वाची माहिती दिली होती.
Post a Comment