माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - सिने अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास करणार्या सीबीआयने मुंबई पोलीस दलातील एका आयपीएस अधिकार्यासह या प्रकरणाचे वांद्रे पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी भूषण बेळणेकर आणि सॅम्युअल मिरिण्डा यांना चौकशीचे समन्स बजावले आहेत.
सीबीआयच्या पथकाने मुंबईत आल्यानंतर तपासाच्या पहिल्याच दिवशी वांद्रे पोलीस ठाण्यातील सुशांतच्या केसचे तपास अधिकारी बेळणेकर आणि अन्य संबंधितांची चौकशी करत संबंधित सर्व कागदपत्रे आणि जप्त केलेले ऐवज, वैद्यकीय अहवाल ताब्यात घेतले आहेत.
सुशांतच्या मोबाईल, लॅपटॉपचा डेटा तपासल्यानंतर आणि कूपर रुग्णालयातील डॉक्टरांची सलग दोन दिवस कसून चौकशी केल्यानंतर आता सीबीआयने तपास अधिकारी भूषण बेळणेकर यांच्यासह एका उपनिरीक्षकाला पुन्हा समन्स बजावले आहेत.
सुशांतचा मित्र संशयाच्या भोवर्यात
सुशांतसिंहचे पार्थिव घेऊन जाणार्या रुग्णवाहिका चालकाला सुशांतचा मित्र संदीपसिंहने चारवेळा फोन केल्याची माहिती उघड झाली आहे. त्याचबरोबर तो अभिनेत्री अंकिता लोखंडेच्याही संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व प्रकारामुळे संदीप सिंह संशयाच्या भोवर्यात सापडला असून, त्याची चौकशी करण्याची मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केली आहे.
सुशांतसिंहने आत्महत्या केल्याचे समजल्यानंतर त्याचा मित्र व दिग्दर्शक संदीपसिंह हा तातडीने त्याच्या घरी गेला व पुढील अनेक प्रक्रिया त्याने पार पाडल्या, अशी नवी माहिती समोर आली आहे. सुशांतचे पोस्टमॉर्टम होऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार होईपर्यंत लागणार्या कागदपत्रांची पूर्तता त्यानेच केली होती. सुशांतचे पार्थिव नेणार्या रुग्णवाहिका चालकाला संदीपसिंहने त्यानंतरच्या 72 तासांत चारवेळा फोेन केला होता. त्याची काय गरज होती, असा प्रश्न आता विचारला जात आहे. त्याच्या कॉल डिटेल्समधून ही बाब समोर आली आहे. दि. 14 जून रोजी संदीप सिंहने रुग्णवाहिका चालकाला सुशांतच्या घरी बोलावले होते. मात्र, या चालकाने आपल्याला मुंबई पोलिसांनी बोलावले होते, असे सांगितले. अक्षय असे या रुग्णवाहिका चालकाचे नाव असून, त्याला संदीपसिंहने 14 जून रोजी 3, तर दि. 16 जून रोजी एक कॉल केला होता. यावेळी दीड ते दोन मिनिटांचे बोलणे झाल्याचे समजते. दरम्यान, संदीपसिंहला सुशांतचे कुटुंबीय ओळखतही नसल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, सुशांतचा सीए संदीप श्रीधर याची सीबीआयने डीआरडीओ गेस्ट हाऊसवर कसून चौकशी करीत सुशांतच्या आर्थिक व्यवहाराची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. सुशांतच्या आर्थिक व्यवहारांची, त्यात रिया चक्रवर्तीचा सहभाग, हस्तक्षेप आणि सुशांतच्या वैयक्तिक आयुष्याबाबत श्रीधर यांच्याकडून माहिती घेण्यात आल्याचे समजते. तसेच, सीबीआयने सिद्धार्थ पठानी, दीपेश सावंत, स्वयंपाकी नीरज, केशव आणि सुशांतचा अकाऊंटंट रजत मेवाटी यांची चौकशी गेस्ट हाऊसवर सुरू ठेवली आहे.
सुशांतच्या मृत्यूप्रकरणात काळ्या पैशांविरोधातील कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास करत असलेल्या ईडीच्या अधिकार्यांचीही सीबीआयच्या अधिकार्यांनी भेट घेऊन त्यांच्याकडून तपासासंबंधी आवश्यक माहिती घेतली आहे.
नार्कोटिक्स विभागही करणार चौकशी
सुशांत प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, आता ड्रग्जसंदर्भात सुशांत सिंह व रिया चक्रवर्ती यांच्यातील व्हॉटस् अॅप चॅटची माहिती नार्कोटिक्स व सीबीआयला दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता नार्कोटिक्स विभागही चौकशी करणार असल्याचे वृत्त इंग्रजी वृत्तवाहिनीने दिले आहे. वाहिनीच्या वृत्तानुसार, रिया चक्रवर्ती ही ड्रग्जचा वापर व त्यासंदर्भातील व्यवहारही करत होती. यापूर्वी भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनीही दुबईतील ड्रग डिलरने सुशांत सिंह राजपूतची भेट घेतल्याचा आरोप केला होता. सुशांतचा कुक नीरजने तो गांजाचे सेवन करत होता, असे आपल्या जबाबात सांगितले होते.
Post a Comment