हेल्थ डेस्क - जगभरात दरवर्षी 65 हजार लोक सिझनल फ्लूने मृत्युमुखी पडतात. पावसाळा सुरू झाला, की भारतातही या सिझनल फ्लूची साथ पसरू लागते. यंदा भारतात ही साथ येईल तेव्हा कोरोना व्हायरसचा धोका आणि सोबतच आरोग्य व्यवस्थेवरचा ताण आणखी वाढेल, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली होती; पण आता कोरोनाच्या साथीमुळे सिझनल फ्लू येणारच नाही, अशी चर्चा सुरू झालीय.
मान्सून सुरू झाला रे झाला, की आपल्या आसपासचं कुणीतरी शिंकायला सुरवात करतं. चार पाच दिवसांनी ऑफिसमधला एक सहकारी, शाळेतला किंवा कॉलेजमधला एखादा मित्र सर्दी-पडशाने आजारी पडलेला असतो. बघता बघता हे सर्दी पडसं, तापाचं दुखणं आपल्या घरातही येऊन पोहोचतं आणि ‘काळजी घ्या रे बाबांनो, फ्लूची साथ सुरू झालीय’ असे शब्द आपल्या कानावर पडतात.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार दरवर्षी जगभरात सुमारे 6 लाख लोक या सिझनल फ्लूमुळे मृत्युमुखी पडतात. कितीतरी लोकांना या फ्लूची लागण होत असते. यावेळी मात्र कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी आपण करत असलेल्या उपाययोजनांमुळे फ्लूच्या रुग्णांमध्ये घट झाल्याचं दिसून आलंय.
वर्षातून दोनदा येतो फ्लू
पावसाळ्यात अनेकदा आपल्याला ताप येतो. ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणं, अंगदुखी अशी काही लक्षणं आपल्याला दिसू लागतात. गंमत म्हणजे, आपण काहीही औषध घेतलं नाही, तरी दोन ते तीन दिवसांत आपण एकदम बरे होऊन पुन्हा कामावर, शाळेत वगैरे जाऊ लागतो. आपल्याला आजारी पाडणारे हे व्हायरस इन्फ्लुएन्झा या नावाने ओळखले जातात. वर्षातून दोनदा हे व्हायरस जास्त सक्रिय होतात. एकदा जूनमधे पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात हिवाळा सुरू होतो तेव्हा आणि दुसर्यांदा डिसेंबरमधे पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात हिवाळा सुरू होतो तेव्हा.
हिवाळ्यातल्या या आजारपणाला सिझनल फ्लू असंही म्हटलं जातं. सिझनल फ्लूचे पेशंट हिवाळ्यात उच्चांक गाठत असले, तरी त्याची सुरुवात त्याआधीच झालेली असते. भारत पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात येणारा देश आहे. भारतात सिझनल फ्लूचे जास्तीत जास्त पेशंट साधारण डिसेंबर, जानेवारी महिन्यात सापडतात. मार्चमधे उन्हाळा सुरू झाला, की ही साथ ओसरते आणि पुन्हा मान्सून आला, की जून महिन्यात या साथीची सुरुवात होते.
Post a Comment