माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - मुंबईकरांना पावसाने झोडपून काढलेले असताना, आता राजकारणही तापले आहे. मुंबईत पडलेला पाऊस 4 तासात की 24 तासात याची पालिका आयुक्तांना माहिती नसल्याचा टोला भाजपने लगावला आहे. तर, काँग्रेसने नालेसफाईवरून आयुक्तांना कोंडीत पकडून कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे.
दक्षिण मुंबई गेल्या दोन दिवसापूर्वी मुसळधार पावसाने झोडपून काढले. कधी नव्हे त्या ठिकाणी पाणी तुंबून अनेक गाड्या पाण्यात बुडाल्या. याबाबत पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी माहिती देताना मुंबईत चार तासात तब्बल 300 मिमी पाऊस पडला तर प्रतितास 101 किमी वेगवान वारा होता. त्यामुळे हे चक्रीवादळच होते, असे त्यांनी सांगितले. यावर भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी शनिवारी ट्वीट करून टीका केली आहे.
आयुक्तांच्या म्हणण्यानुसार चार तासात 300 मिमी पाऊस पडला. पण कुलाबा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार 24 तासात 300 मिमी पाऊस पडला, मग खरं काय ? आयुक्तांनी व्हर्च्युअली नालेसफाईचा 113 टक्के दावा केला. तसाच हा ही दावा नाही ना? रतन खत्रीचे असे रोज नवे आकडे सांगून मुंबईकरांना का फसवताय असा चिमटा शेलार यांनी काढला
नालेसफाई न झाल्याने मुंबई पाण्याखाली
पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आयुक्तांचा 113 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा पहिल्या पावसातच नाल्यांच्या पुरात वाहून गेला. नालेसफाई झालेली नाही, याकडे आपण छायाचित्रांच्या पुराव्यासह निदर्शनास आणून दिले होते. नालेसफाई न झाल्याने मुंबई पाण्याखाली गेली असून या प्रकरणी कंत्राटदारांना जबाबदार धरा. पालिकेच्या सात परिमंडळातील कंत्राटदारांना कारणे दाखवा नोटीस पाठवा. त्यांना काळ्या यादीत टाका आणि त्यांची बिले रोखून नाकेबंदी करा, अशी मागणी राजा यांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
Post a Comment