अहमदनगर - विषारी औषध प्राशान करून पुरुष व महिलेने आत्महत्या केल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील माणिक दौंडी येथे घडली. इंद्रजित वाल्मिक इंगळे (वय- 35 रा. शिरोडा ता. कन्नड जि. औरंगाबाद), रेखा सानप (वय- 30 रा. पैठण जि. औरंगाबाद) असे आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. गुरूवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, माणिक दौंडी येथील रोडच्या कडेला एका हॉटेलजवळ एक दुचाकी (क्र. एमएच- 15 जीटी- 4027) उभी असून दुचाकी पासून शंभर मीटर अंतरावर एक पुरूष व एक महिला यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली असल्याची माहिती माणिक दौंडीचे सरपंच यांनी पाथर्डी पोलिसांना दिली. शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
मयत पुरूषाच्या खिशात पाकीट व ओळख पत्रावरून तो इंद्रजित इंगळे असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी इंद्रजित याचे वडील वाल्मिक इंगळे यांना आत्महत्येची माहिती दिली. आत्महत्या केलेल्या महिले विषयी वाल्मिक इंगळे यांच्याकडे चौकशी केली असता, ती माझी सून नसल्याचे वाल्मिक यांनी पोलिसांना सांगितले. अधिक चौकशीअंती सदर मयत महिला मयत इंद्रजित याचा घरमालक बाळासाहेब सानप याची पत्नी असल्याचे पोलीस तपासात समोर आले. या दोघांनी कोणत्या कारणातून आत्महत्या केली याचा तपास पाथर्डी पोलीस करीत आहे.
Post a Comment