माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - कोरोनामुळे लांबलेले महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आता दि. 7 आणि 8 सप्टेंबर असे दोनच दिवस होणार आहे. सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता सुरक्षित शारीरिक अंतराचा निकष पाळून आणि सुरक्षेविषयी आवश्यक त्या उपाययोजना करून हे अधिवेशन घेण्याचा निर्णय मंगळवारी दोन्ही सभागृहांच्या कामकाज सल्लागार समित्यांच्या बैठकांत घेण्यात आला.
कामकाज सल्लागार समित्यांच्या बैठका मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाल्या. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली या बैठका झाल्या. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, संसदीय कामकाजमंत्री डॉ. अनिल परब आदी यावेळी उपस्थित होते.
अधिवेशनाच्या आदल्या दिवशी म्हणजे 6 सप्टेंबर रोजी सर्व सदस्यांची ‘आरटी-पीसीआर’ तपासणी केली जाणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी सदस्यांची बसण्याची व्यवस्था आवश्यकतेप्रमाणे सभागृहाच्या प्रेक्षक आणि विद्यार्थी गॅलरीमध्येही करण्यात येणार आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रत्येक सदस्याला सुरक्षा किट देण्यात येणार आहे. या किटमध्ये फेस शिल्ड, मास्क, हँड ग्लोव्हज, सॅनिटायझर आदी वस्तूंचा समावेश असेल.
Post a Comment