माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - अंदमान-निकोबारला देशाशी जोडणार्या सबमरिन म्हणजे समुद्राखालील ऑप्टिकल फायबर केबलचे (ओएफसी) उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी झाले. अंदमान-निकोबार बेटावर राहणार्या लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध असून सबमरिन ओएफसी नेटवर्कचे काम हे त्याचे द्योतक असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले.
अंदमान-निकोबार बेटावरील पोर्ट ब्लेअर ते तामिळनाडूतील चेन्नई या शहरांना जोडणारे समुद्राखालील ऑप्टिकल फायबर नेटवर्कचे काम पूर्ण झाले आहे. त्याचे उद्घाटन मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले.केवळ अंदमान-निकोबार बेटावरील लोकांसाठी नव्हे तर देशवासीयांसाठी आजचा दिवस महत्त्वपूर्ण असल्याचे मोदी यांनी सांगितले. प्रकल्प जितका मोठा असतो, आव्हाने तितकी मोठी असतात, असे सांगून पंतप्रधान पुढे म्हणाले की, अंदमान-निकोबार ओएफसीद्वारे जोडण्याचे काम याआधीच पूर्ण व्हायला हवे होते; पण उशिराने का होईना हे काम पूर्ण झाले आहे.
सबमरिन केबलद्वारे पोर्ट ब्लेअरपासून स्वराज द्वीप (हॅवलॉक), कार निकोबार, कामरोटा, ग्रेट निकोबार, लाँग आयलँड, रंगात ही ठिकाणेही जोडली गेली आहेत. स्थानिक अर्थव्यवस्थेला ओएफसीमुळे मोठी चालना मिळणार असून हाय स्पीड ब्रॉडबँड संपर्क, वेगवान आणि भरोसादायक मोबाईल तसेच लँडलाईन दूरसंचार सेवा, ई-प्रशासन, टेली मेडिसिन, टेली एज्युकेशन याला चालना मिळणार आहे.
Post a Comment