ENG vs PAK: जेम्स अँडरसन ६०० विकेट्स घेणारा पहिला वेगवान गोलंदाज

 

माय अहमदनगर वेब टीम

साऊथॅम्प्टन - इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज जेम्स अंडरसनने मंगळवारी (दि. २५) साऊथॅम्प्टनमधील द रोज बॉल मैदानावर इतिहास रचला. तो कसोटी क्रिकेटमध्ये ६०० विकेट्स पूर्ण करणारा क्रिकेटच्या इतिहासातील पहिला वेगवान गोलंदाज ठरल आहे. पाकिस्तानचा कर्णधार अझर अलीला बाद करून त्याने ही कामगिरी केली. सर्वाधिक विकेट मिळवणा-यांच्या यादीत अंडरसनने चौथ्या क्रमांकावर उडी घेतली आहे. 


पाकिस्तानविरुद्धच्या तिस-या कसोटी सामन्यात पाचव्या दिवशी डावाच्या ६२ व्या षटकातील दुस-या चेंडूवर अँडरसनने अझर अलीला झेलबाद केले. जो रुटने त्याचा झेल पकडला. अझरने ११४ चेंडूंत २ चौकारांच्या मदतीने ३१ धावा केल्या.


श्रीलंकेचा मुथिय्या मुरलीधरन पहिल्या तर ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न दुसर्‍या क्रमांकावर आहे. तिसर्‍या क्रमांकावर भारताचा अनिल कुंबळे आहे. हे तिघेही फिरकीपटू आहेत. मुरलीधरनने कसोटी क्रिकेटमध्ये ८०० बळी घेतले आहेत. वॉर्नचे कसोटीत ७०८ बळी आहेत. अनिल कुंबळेने आपल्या कसोटी कारकीर्दीत ६१९ जणांना तंबूचा रस्ता दाखवला आहे. अँडरसनने ३३,७१७ व्या चेंडूवर आपला ६०० बळींचा टप्पा गाठला. सर्वात कमी चेंडूत ६०० बळी घेण्याच्या बाबतीत तो दुसर्‍या क्रमांकावर आहे. मुरलीधरन पहिल्या क्रमांकावर आहे. मुरलीधरनने ३३,७११ व्या चेंडूवर ६०० वी विकेट घेतली होती. शेन वॉर्न तिसर्‍या आणि अनिल कुंबळे चौथे स्थानी आहे. ६०० वी विकेट घेण्यासाठी वॉर्नला ३४,९१९ आणि कुंबळेला ३८,४९६ चेंडू टाकावे लागले. 


२००३ मध्ये जेम्स अँडरसनने मार्क वेर्मलेनला बाद करून पहिली कसोटी विकेट घेतली. २००७ मध्ये महेंद्रसिंग धोनी त्याचा ५० वा कसोटी बळी ठरला होता. २००८ मध्ये जॅक कॅलिसला बाद करून त्याने आपली १०० वी कसोटी विकेट पूर्ण केली होती. २०१० मध्ये अँडरसनने २०० कसोटी बळींचा टप्पा पूर्ण केला. पीटर सिडल त्याचा २०० वा कसोटी बळी ठरला. पुढच्या शंभर विकेट्स म्हणजेच ३०० कसोटी विकेट्स घेण्यासाठी त्याला ३ वर्षे प्रतीक्षा करावी लागली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post