देशातील कोरोनाबाधितांची संख्या साडेसतरा लाखांवर




माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - देशात कोरोनाबाधितांची संख्या  वेगाने वाढत आहे. मात्र, रविवारी एक सुखद माहिती समोर आली आहे. शनिवारी दिवसभरात आतापर्यंतचे उच्चांकी 51 हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले. देशातील कोरोनामुक्तीचे प्रमाण वेगाने वाढत असल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे, दिवसागणीक रुग्णसंख्या वाढत असल्याने कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचे आव्हान अजूनही केंद्रासह राज्य सरकारांसमोर उभे आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळपर्यंत देशात 54 हजार 735 नवीन कोरोना रुग्ण आढळले.  तर 853 रुग्णांचा मृत्यू झाला. देशात कोरोना संसर्गाची लागण सुरू झाल्यापासून आतापर्यंतची सर्वात उच्चांकी कोरोनामुक्त रुग्णांची संख्या नोंदवण्यात आली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 17 लाख 50 हजार 723 एवढी झाली आहे. .यातील 11 लाख 45 हजार 629 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. तर 5 लाख 67 हजार 730 रुग्णांवर देशातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 37 हजार 364 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुक्तीचा दर त्यामुळे 65.44 टक्के एवढा नोंदवण्यात आला आहे.

देशातील मृत्यू दराचे प्रमाण 2.13 टक्के नोंदवण्यात आले आहे. महाराष्ट्रात गेल्या एका दिवसात सर्वाधिक 9 हजार 601 कोरोनाबाधित आढळून आले. महाराष्ट्रापाठोपाठ आंध्र प्रदेश (9,276), तामिळनाडू (5,879), कर्नाटक (5,172), उत्तर प्रदेश (3,587), बिहार (3,007), पश्चिम बंगाल (2,589) तसेच तेलंगणात (2,083) इतक्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. सर्वाधिक कोरोना प्रभावित महाराष्ट्रात गेल्या एका दिवसात तब्बल 322 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post