गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्ती काँग्रेसचा अध्यक्ष व्हावी!

 


माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली - एकीकडे काँग्रेसमध्ये पक्षाची सूत्रे पुन्हा राहुल गांधींच्या हातात देण्याची मागणी होत आहे. तथापि, राहुल गांधी त्यासाठी तयार नाहीत. तर पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वधेरा यांनीही राहुल गांधींच्या निर्णयाला पाठिंबा देताना गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीस अध्यक्ष बनवावे, असे मत व्यक्त केले आहे. 

प्रदीप चिब्बर आणि हर्ष शाह लिखित ‘इंडिया टुमारो’ या पुस्तकात हा दावा करण्यात आला आहे. 13 ऑगस्ट रोजी या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे. दरम्यान, निवडणुकीत भाजपविरोधात पराभव झाल्याबद्दल विचारले असता, काँग्रेस नव्या प्रसारमाध्यमांना समजण्यात संथ होती आणि जेव्हा पक्षाने ते समजून घेण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत नुकसान झाले होते, असे मत व्यक्त केले.प्रियांका गांधींनी म्हटले आहे की, कदाचित राजीनामा पत्रात नसेल; पण कुठेतरी राहुल गांधींनी आपल्यापैकी कुणीच पक्षाचे अध्यक्ष होऊ नये, असे म्हटले आहे. मी या मताशी पूर्णतः सहमत आहे. मला वाटते की, पक्षाने आपली वाट स्वतःच शोधली पाहिजे. 

भाजपने जेव्हा रॉबर्ट वधेरा यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, त्याविषयी विचारले असता प्रियांकांनी म्हटले आहे की, या आरोपानंतर मी माझ्या 13 वर्षीय मुलाजवळ जाऊन त्याला प्रत्येक व्यवहाराची माहिती दिली. मुलीलाही सर्व माहिती दिली. त्यांना सर्वकाही स्पष्टपणे सांगितले. मी मुलांपासून काही लपवत नाही. त्यांच्याशी खुलेपणाने बोलते. 

बॉस म्हणून स्वीकारेन 

गांधी कुटुंबाबाहेरील पक्षाच्या अध्यक्षास बॉस म्हणून मी नक्कीच स्वीकारेन. जर त्या पक्षाध्यक्षांनी मला सांगितले की, त्यांना माझी गरज उत्तर प्रदेशात वाटत नाही तर अंदमान निकोबारमध्ये वाटते, तर मी आनंदाने अंदमान-निकोबारला जाईन, असे प्रियांका गांधींनी म्हटले आहे.





0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post