माय अहमदनगर वेब टीम
बीड - चोऱ्या, दरोडे, लुटमार यातील केज तालुक्यातील कुख्यात गुन्हेगारावर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी एमपीडीएम कायद्यानुसार कारवाई करुन त्याला हर्सूल कारागृहात स्थानबद्ध केले. केज पोलिसांनी वेषांतर करुन शेतकऱ्यांच्या वेशात जाऊन या गुन्हेगाराला अटक केली व हर्सूलमध्ये त्याची रवानगी दिली. आठवडाभरात एमपीडीए नुसार झालेली ही दुसरी कारवाई आहे.
कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी प्रतिबंधात्मक कारवायांवर भर दिल्याचे दिसत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला वाळू माफियावर एमपीडीए नुसार कारवाई केली गेली होती त्यानंतर आता केज तालुक्यातील पिंपळगाव घोळवे येथील विक्रम शिवराम शिंदे याच्या विरोधात कारवाई केली गेली. विक्रम याच्यावर चोरी, दरोडा टाकणे, दंगा करणे, शरिर व मालाविरुद्धचे गुन्हे करणे असे एकूण 10 गुन्हे नोंद आहेत. अंबाजोगाईच्या अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली केज ठाण्याचे पीआय प्रदीप त्रिभूवन यांनी विक्रम याच्यावर एमपीडीए नुसार कारवाईचा प्रस्ताव पाठवला होता. एलसीबी पीआय भारत राऊत यांनी यासाठी पाठपुरावा केला. जिल्हाधिकाऱ्यांनी एमपीडीएला मान्यता दिली.
दरम्यान, केज पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी विक्रम शिंदे याच्या अटकेसाठी प्रयत्न केले पण तो पसार होत होता. त्यामुळे रविवारी पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून तो एका शेतात असल्याने पोलिसांनी शेतकऱ्यांचा वेष घेऊन तो असलेल्या ठिकाणी सापळा लावला व त्याला अटक केली. पोलिस उपनिरिक्षक श्रीराम काळे व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. या गुन्हेगाराची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
Post a Comment