बहीण-भावाच्या पवित्र नात्याचे प्रतीक असणाऱ्या राखी पौर्णिमेचा सण 3 ऑगस्ट सोमवारी आहे. जगभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटाचे सावट या सणावरही आहेच. कदाचित दुसऱ्या शहरात असलेल्या बहिणीला भेटण्यासाठी भावाला जाणे शक्य होणार नाही. मात्र, प्रत्यक्ष भाऊ जवळ नसला तरी भावासमान असणाऱ्याला राखी बांधून सण साजरा करण्याचे आवाहन पुरोहित संघटनेचे संघटन अध्यक्ष सुभाष मुळे गुरुजी यांनी केले आहे. राखी पौर्णिमेला २९ वर्षांनंतर सर्वार्थ सिद्धी आणि दीर्घायू आयुष्यमान योग येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यंदा अनेक वर्षांनी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन एकत्र येत आहे. भावाला राखी बांधण्याची बहिणीला ओढ लागली आहे. बाजारात राख्यांची दुकानेही सजली आहेत. कोरोनामुळे हा सणही फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळूनच साजरा करावा लागणार आहे. मात्र, संसर्गजन्य रोगाच्या सावटाखाली सण साजरा करतानाही त्याचा उत्साह कमी होऊ देऊ नका.
दिवसभर शुभ मुहूर्त
तीन ऑगस्ट रोजी सकाळी ७:३० ते ९ वाजेपर्यंत राहुकाळ आहे. राहुकाळ यज्ञयागासाठी किंवा बाहेरगावी जाण्यासाठी बघितला जातो. तर, त्यानंतर सकाळी ९:२६ पर्यंत विष्टी भद्रा आहे. हा काळ अशुभ समजला जातो. यामुळे यापूर्वी राखी बांधण्यासाठी वेळ योग्य नाही. तर, सकाळी ९:२६ नंतर सूर्यास्तापर्यंतचा दिवसभराचा वेळ राखी बांधण्यासाठी शुभ असल्याचे सुभाष मुळे यांनी सांगितले.
दीर्घायू आयुष्यमान योग ठरेल फलदायी
मुळे म्हणाले, यंदाचे रक्षाबंधन आणखी एका बाबीसाठी खास ठरणार आहे. यंदा २९ वर्षांनंतर राखी पौर्णिमेला सर्वार्थ सिद्धी आणि दीर्घायू आयुष्यमान योग येत आहे. यासोबतच सूर्याचा शनी समसप्तक योग, सोमवती पौर्णिमा, मकर चंद्रमा श्रवण नक्षत्र, उत्तराषाढा नक्षत्र आणि प्रीती योग येत आहे. यापूर्वी १९९१ मध्ये असा योग आला होता. कृषी क्षेत्रासाठीही हा योग फलदायी समजला जातो. यंदा सुरू असलेला भरपूर पाऊस त्याचेच द्याेतक आहे.
Post a Comment