माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - कोरोना चाचणीपाठोपाठ आरोग्य विभागाने आता राज्यात सीटीस्कॅन चाचणीचे दर निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली चारसदस्यीय समिती नेमली आहे. या समितीला सात दिवसांत समिती अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
यापूर्वी कोरोना आणि इतर रुग्णांच्या तपासणीसाठी खासगी रुग्णालयांनी आकारावयाचे दर तसेच खासगी प्रयोगशाळांनी आरटीपीसीआर, रॅपिड अँटिजेन, अँटिबॉडी चाचण्यांसाठीचे दर निश्चित केले आहे.
कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी सीटीस्कॅनसारख्या चाचणीची देखील आवश्यकता भासते. त्यासाठी खासगी रुग्णालये किंवा सीटीस्कॅन सुविधा असलेल्या केंद्रांकडून अवाजवी रक्कम आकारण्याबाबत तक्रारी आल्या आहेत. त्याची दखल घेऊन ही समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती एचआरसीटी चाचणीच्या दर निश्चितीसाठी खासगी रुग्णालये व एचआरसीटी चाचणी केंद्रांशी चर्चा करून सात दिवसांत शासनाला अहवाल सादर करतील.
Post a Comment