मुंबईमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने वाढणार ?

 


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - भारतात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. भारतात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा २० हजारांच्या जवळ पोहोचत असताना महाराष्ट्रातही परिस्थिती गंभीर होत आहे. एकट्या महाराष्ट्रात कोरोनाचे ४ हजार ६६९ रुग्ण आहेत. यात मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. दरम्यान, ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पाच सदस्यीय टीमने असा अंदाज वर्तवला आहे की, मुंबईत ३० एप्रिलपर्यंत ४२ हजार ६०४ कोरोना प्रकरणांची नोंद होईल. तर, हा आकडा १५ मे पर्यंत ६ लाख ५६ हजार ४०७ वर जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने १६ एप्रिल रोजी मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची गणिती मॉडेलिंगच्या आधारे ही आकडेवारी जाहीर केली.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरुवातीला एकत्र केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत १३ हजार ६३६ व्हेंटिलेटर आणि ४ लाख ८३ हजार आयसोलेशन बेडचा अभाव असेल. त्यामुळे येत्या काळात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढल्यास राज्य सरकारपुढे मोठ्या समस्या असण्याची शक्यता आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, राज्य सरकारने केंद्रीय मंत्री गटाकडे राज्यातील आकडेवारी सादर केली. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारी आणि या आकडेवारीत विसंगती दिसून आली. राज्य सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीत मुंबईत १६ एप्रिलपर्यंत ऑक्सिजनच्या आधाराशिवाय वेगळ्या ३० हजार ४८१ बेडची कमतरता असेल. तर, ऑक्सिजनच्या सपोर्टवर असलेल्या ५ हजार ४६६ बेडची कमतरता असेल.

दरम्यान धारावी, वरळी-महालक्ष्मी, माटुंगा / सायन, परळ, अंधेरी पश्चिम, गोवंडी-मानखुर्द, नागपाडा आणि भायखळा या भागांमध्ये कोरोनाचे प्रमाण सर्वाधिक वाढेल. या भागातील उद्रेक सोडविण्यासाठी एकूण ८,४३४ स्वयंसेवकांची आवश्यकता आहे, असे अहवालात म्हटले आहे.

महाराष्ट्रातील ज्येष्ठ अधिका-यांनी दिलेल्या माहितीत, या आकडेवारीमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा हा ३.८ दराने दुप्पट करण्यात आला आहे. यावर आम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. डिस्चार्ज रूग्णांमध्ये तथ्य नसून झोपडपट्टीतील उच्च जोखमीच्या रुग्णांना वेगळे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या सगळ्या उपाय योजनेतून असे चित्र काढणे सिद्ध होत नाही, असे सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post