दिल्ली दंगल प्रकरणी उमर खालिदला १० दिवसांची पोलीस कोठडी



माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - दिल्ली दंगल प्रकरणात उमर खालिदला १० दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. कडकड्डूमा कोर्टाकडे त्याची १० दिवसांची पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली होती. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा (JNU) माजी विद्यार्थी उमर खालिद याला दिल्ली दंगल प्रकरणाचा तपास करणा्ऱ्या पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. सुमारे दोन तासांच्या चौकशीनंतर काल रात्री उमर खालिदला अटक करण्यात आली. उमर खालिदला कोर्टात हजर केलं जाणार होतं. पण पोलिसांनी उमरला कोर्टात नेलं नाही.

उमर खालिदची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव कोर्टात न नेता उमर खालिदला व्हर्च्युअल पद्धतीने हजर करण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने कोर्टात अर्ज केला होता. कोर्टाने ते मान्य केले. या खटल्याची सुनावणी घेणारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमिताभ रावत यांच्याकडे दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने उमर खालिद याचा १० दिवसांचा रिमांड मागितला.

उमर खालिद याच्या वकिलांनी कोठडी देण्याच्या मागणीला विरोध केला. उमर खालित याच्या जीवाला धोका आहे. उमर खालिदने सीएएला विरोध केला. सरकारच्या एखाद्या निर्णयाला विरोध करणं हा गुन्हा कसा काय ठरू शकतो. दिल्ली दंगल प्रकरणात पोलीस उमर खालिद याला विनाकारण अडकवत आहे, खालिदचे वकील त्रिदीप पैस यांनी कोर्टात बाजू मांडली.

उमर खालिद हा पोलिसांना तपासात वारंवार सहकार्य करत आहे. जुलैमध्येही त्याची ५ तासांहून अधिक चौकशी केली गेली होती. आणि पोलिसांनी बोलावल्यावर कालही तो हजर झाला. दिल्लीत २३ ते २६ फेब्रुवारी दरम्यान दंगल उसळली होती. या काळात उमर खालिद हा दिल्लीत नव्हता, असा युक्तीवाद त्याच्या वकिलांनी केला.

न्यायाधीश अमिताभ रावत हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या खटल्याची सुनावणी करीत आहेत. दिल्ली पोलिसांनी उमर खालिद विरोधात ६ मार्चला गुन्हा दाखल केला होता. अमेरिकेच्या अध्यक्षांच्या दिल्ली भेटीदरम्यान नागरिकांना एकत्र करणं, प्रक्षोभक भाषण करणं, नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासाठी उद्युक्त करणं यासह अनेक आरोप उमर खालिदवर आहेत. दंगल भडकवणं आणि हिंसाचाराचा पूर्वनियोजित कट रचण्याचा आरोपही त्याच्यावर आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने उमर खालिदला यूएपीए कायद्यांतर्गत अटक केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post