केंद्रीय मंत्र्याने राजीनामा दिल्याने पीएम मोदींकडून ट्विटची मालिका; पाहा काय म्हणाले!



माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - शेतीशी संबंधित विधेयकांना काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी संसद आणि संसदेबाहेर गुरुवारी तीव्र विरोध केला. कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी लोकसभेत याबाबतची दोन विधेयके मांडल्यानंतर बहुतांश विरोधी खासदारांनी ही विधेयके शेतकरीविरोधी असल्याचा दावा केला. दरम्यान, अकाली दलाचे खासदार सुखबीरसिंग बादल यांनी आपल्या पक्षाच्या नेत्या हरसिमरत कौर विधेयकाच्या विरोधात केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देतील, अशी घोषणा केली. 

हरसिमरत कौर यांनी राजीनामा दिल्यानंतर पीएम मोदी यांनी सलग चार ट्विट केले. त्यांनी म्हटले आहे, की लोकसभेत ऐतिहासिक कृषी सुधार बिले मंजूर करणे हा देशातील शेतकरी व कृषी क्षेत्रासाठी महत्वाचा क्षण आहे. ही बिले शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने मध्यस्थ व सर्व अडचणींपासून मुक्त करतील. ते दुसऱ्या ट्विटमध्ये म्हणतात, या कृषी सुधारणेमुळे शेतकर्‍यांना त्यांचे उत्पादन विकायला नवीन संधी मिळतील, ज्यामुळे त्यांचा नफा वाढेल. याद्वारे आपल्या कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळेल, शेतकरी सक्षम होईल.

ते तिसऱ्या ट्विटमध्ये म्हणतात की, बऱ्याच शक्ती शेतकऱ्यांना गोंधळात टाकण्यात गुंतल्या आहेत. मी माझ्या शेतकरी बांधवांना आश्वासन देतो की एमएसपी आणि सरकारी खरेदीची प्रणाली कायम राहील. ही बिले खरोखरच शेतकऱ्यांना आणखी बरेच पर्याय देऊन त्यांना सक्षम बनवणार आहेत.

शेतीशी संबंधित तीन विधेयके केंद्र सरकारने आणली असून यातील अत्यावश्यक वस्तू कायद्यातून शेतमाल वगळण्याबाबतचे विधेयक नुकतेच सरकारने मंजूर करून घेतले होते. या पार्श्वभूमीवर सरकारने आज कृषी उत्पादन व्यापार व वाणिज्य (संवर्धन तसेच सुविधा) आणि कृषी (सशक्तीकरण व संरक्षण) किंमत आश्वासन करार तसेच कृषी सेवा ही दोन विधेयके लोकसभेत सादर केली. 

तिन्ही विधेयके शेतकऱ्यांच्या विरोधात असून यासंदर्भात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन सुरू असल्याचे अकाली दलाचे खासदार सुखबीरसिंग बादल यांनी सांगितले. आपल्या पक्षाच्या नेत्या हरसिमरत कौर विधेयकांच्या विरोधात केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देतील, अशी घोषणा त्यांनी केली. विशेष म्हणजे हरसिमरत या सुखबीरसिंग बादल यांच्या पत्नी आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post