माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली- गेल्या कित्येक दिवसांपासून कंगना रणौत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना लक्ष्य करत आहे. सुरुवातीला घराणेशाहीवर बोलल्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये असलेल्या ड्रग्ज माफियांबद्दलही बोलायला सुरुवात केली. अलीकडेच राज्यसभेत जया बच्चन यांनी कोणाचंही नाव न घेता प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, ज्या कलाकारांनी या इण्डस्ट्रीत काम केलं तेच आता याला नावं ठेवत आहेत.
जया बच्चन यांच्या भाषणानंतर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली. आता यावर हेमा मालिनी यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाचे खासदार रवी किशन यांनी सिनेसृष्टीत वाढलेल्या अमली पदार्थांच्या सेवनाबद्दल मत व्यक्त केलं होतं. रवी किशन यांना उत्तर देताना राज्यसभेत जया बच्चन यांनी भाषण केलं होतं.
सुशांतच्या जागी अभिषेकने आत्महत्या केली असती तर हेच बोलला असता का? कंगनाचा जया यांना प्रश्न
जया बच्चन यांच्या समर्थनात आल्या हेमा मालिनी
हेमा मालिनी म्हणाल्या की, संसदेत जया बच्चन यांनी जे सांगितलं त्याच्याशी त्या सहमत आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हेमा मालिनी म्हणाल्या की, 'या गोष्टी अनेक क्षेत्रात आणि जगभरात बऱ्याच ठिकाणी घडत असतात. सिनेसृष्टीतही या गोष्टी असतील. पण याचा अर्थ असा होत नाही की संपूर्ण सिनेसृष्टी खराब आहे. ज्या पद्धतीने लोक याला जाणीवपूर्वक लक्ष्य करत आहेत ते चुकीचं आहे.'
काय म्हणाल्या होत्या जया बच्चन
जया बच्चन यांनी मंगळवारी राज्यसभेत सांगितलं की, 'सिनेसृष्टी रोज पाच लाख लोकांना थेट रोजगार देते. मनोरंजन क्षेत्रातील लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून भडकावले जात आहे. याच इण्डस्ट्रीत नाव कमावलेल्या लोकांनी आता याला गटार म्हटलं आहे. मी या मताशी सहमत नाही. मला आशा आहे की सरकार अशा लोकांना अशा पद्धतीची भाषा न वापरण्याचा सल्ला देतील. सिनेसृष्टीत काही लोक खराब असल्यामुळे तुम्ही संपूर्ण सिनेसृष्टीला दोष देऊ शकत नाही. मला लाज वाटते की काल लोकसभेतील एका सदस्याने, जे सिनेसृष्टीतीलच एक भाग आहे त्यांनी याविरूद्ध भाषण केलं. हे फार लाजीरवाणं आहे.'
कंगना रणौतनेही विचारला जया बच्चन यांना प्रश्न
कंगना रणौतने ट्वीट करत स्पष्ट केलं की, 'जया जी, माझ्या जागी तुमच्या मुलीला किशोरवयीन असताना मारहाण केली जाती, नशा करायला भाग पाडलं असतं आणि लैंगिक अत्याचार केले असते तर तेव्हाही तुम्ही हेच बोलला असता का? जर अभिषेकचा सतत छळ केला गेला असता आणि त्याला त्रास दिला गेला असता.. या सगळ्यानंतर एक दिवस जर त्याने आत्महत्या केली असती तर तेव्हाही तुम्ही हेच बोलला असता का? आमच्यावरही काही दया दाखवा.'
Post a Comment