माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - कोरोनामुळे करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात बसला असून, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था २३.९ टक्क्यांनी घसरली आहे. आतापर्यंत झालेली अर्थव्यवस्थेची ही सर्वात मोठी घसरण होय. देशाच्या घसरलेल्या अर्थव्यवस्थेवरुन मोदी सरकार आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर टीका करण्यात येत आहे.
भारतीय सांख्यिकी विभागाने एप्रिल ते जून या तिमाहीतील अर्थव्यवस्थेबाबतची आकडेवारी सोमवारी जाहीर केली. त्यामधून वरील निष्कर्ष निघाले आहेत. अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांपैकी कृषिक्षेत्रवगळता अन्य सर्व क्षेत्रांमध्ये घसरण झालेली दिसून येत आहे. मागील वर्षी याच काळात भारतीय अर्थव्यवस्था ५.२ टक्क्यांनी वाढली होती. त्या पार्श्वभूमीवर यावेळी झालेली घट ही खूपच मोठी आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस देशात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन सुरू करण्यात आले. त्यामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. याचा फटका एकूण देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) कमी होण्यात बसण्याची अपेक्षा होतीच. या अपेक्षेपेक्षा जीडीपी मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. देशातील अर्थव्यवस्थेच्या घसरगुंडीवरुन काँग्रसने भाजपावर निशाणा साधला आहे.
काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन जनतेने कष्टाने कमावलेल्या अर्थचा भाजपाने अनर्थ केला, असा टोला लगावला आहे. कोरोनाच्या अगोदरपासूनच देशाच्या अर्थव्यवस्थेला संपविण्यात आलंय. असंघटीत क्षेत्रावर जाणीवपूर्वक अतिक्रमण करण्यात आलं. कारण, संघटीत क्षेत्रावर नियंत्रण ठेवणा-यामोदींच्या मित्रांना याचा लाभ व्हावा, यासाठीच असंघटीत क्षेत्रावर अतिक्रमण झाल्याचे काँग्रेस नेते पवन खेरा यांनी म्हटलंय. तसेच, गेल्या कित्येक वर्षांपासून देशातील नागरिकांना कमावलेल्या पैशाची भाजपाने विल्हेवाट लावल्याचा आरोपही खेरा यांनी केला आहे.
दरम्यान, सन २०२०-२१ या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचे एकूण देशांतर्गत उत्पादन २६.९० लाख कोटी रुपये एवढे राहिले. मागील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एकूण देशांतर्गत उत्पादन ३५.३५ लाख कोटी रुपये होते. म्हणजेच अर्थव्यवस्थेचा २३.९ टक्क्यांनी संकोच झाला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीही संकोच झालेला नाही. अनेक पतमापन संस्थांनी कोरोनामुळे अर्थव्यवस्था घट नोंदवेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
Post a Comment