कांदा निर्यातबंदी लवकरच उठणार; भाजप खासदार सुभाष भामरेंची माहिती

 



माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली - कांदा निर्यातबंदी प्रश्नावर लवकरच तोडगा निघणार असून केंद्र सरकारच्या वतीने कांद्यावर लावण्यात आलेली बंदी उठवण्यात येईल. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी दिलासादायक माहिती माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री आणि भाजप खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी गुरुवारी दिली आहे. 

कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी धुळ्याचे खासदार डॉ. भामरे यांनी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कांदा प्रश्नावर लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी केली. यासंदर्भात भामरेंनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र देखील दिले आहे.

कांद्याचे भाव कोसळत असल्याने उत्तर महाराष्ट्र भागातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे निर्यातबंदीच्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा व निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी खासदार डॉ. भामरे यांनी केली आहे. केंद्र सरकारने कांद्यावर तडकाफडकी निर्यातबंदी घातली आहे. देशातील कांदा उत्पादक शेतकरी या निर्णयानंतर हवालदिल झाले आहेत. कांदा प्रश्न पुन्हा एकदा त्यामुळे पेटला आहे.

निर्यात बंदी उठवावी या मागणीसाठी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक होवून रस्त्यावर उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. भामरेंकडून देण्यात आलेली माहिती दिलासादायक ठरणारी आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या या निर्णयावर महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकरी नाराज झाला आहे. केंद्र सरकारने हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, या मागणीने जोर धरला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post