नवी दिल्ली - चिनी सैन्याने काल दक्षिण लडाखमधील पँगोंग तलावाजवळील भारतीय सैन्याच्या जवळ येणाचा प्रयत्न केला होता. आज (दि. ८) चिनी सैनिकांचे धारदार भाले आणि अॅटोमेटिक राफल घेतलेले फोटो समोर आले आहेत. त्यामुळे चिनी सैनिकांनी १५ जूनला गलवान खोऱ्यामध्ये जो हिंसाचार केला होता त्याची पुनरावृत्ती करण्याच्या तयारीत आहेत का अशी शंका उपस्थित होत आहे. १५ जूनला गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झडपीत २० भारतीय जवान शहीद झाले होते.
या फोटोवरून चिनी लष्कर मोठ्या प्रमाणावर हिंसक हत्यारे वापरत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या फोटोमध्ये प्रत्येक चिनी सैनिक भाला आणि रायफलने सज्ज आहे. सोमवारी चिनी आणि भारतीय सैनिक भारताने अधिगृहीत केलेल्या दक्षिण पँगोंग भागातील महत्वाच्या डोंगरांवर शुटिंग रेंजच्या अंतरावर आले होते.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी चिनी सैनिक मुखपारी जवळ भारतीय सैनिकांच्या कॅम्पजवळ आले होते. त्यावेळी भारतीय सैनिकांनी त्यांना हटकले आणि त्यांना आपली शस्त्रे दाखवली. यावेळी भारतीय सैनिकांनी मोठ्याने ओरडत जर चिन्यांनी प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडली तर प्रत्युत्तरात गोळीबार करण्यात येईल असा इशारा दिला. चिनी तेथून मागे फिरले पण जाता जाता त्यांनी इशारा देणारी फायरिंग केली. काही सैनिक भारतीय कॅम्पच्या जवळ आले आणि काहींनी हवेत गोळीबारही केला.
जेव्हापासून भारतीय सैन्याने मोक्याच्या जागा अधिगृहीत केल्यापासून चिनी सैन्याने अनेक भारतीय कॅम्पच्या जवळ येण्याचे अनेक प्रयत्न केले. भारतीय सैन्याला उकसवण्याच्या अनेक प्रयत्नानंतरही भारतीय सैन्याने आपली स्थिती कायम राखण्यात यश मिळवले आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिन्यांचा गलवान खोऱ्यातील हिंसाचाराची पुनरावृत्ती करण्याचा मानस असल्याचे स्पष्ट होते. पँगोंग भागात चीनकडून सद्यस्थिती बदलण्याचे २९ ऑगस्ट आणि ३१ ऑगस्ट असे दोनदा प्रयत्न झाले आहेत. यावेळी भारतीय सैन्य सतर्क होते आणि त्यांनी चिन्यांचा हा डाव हाणून पाडला अशी माहिती सरकारने दिली आहे.
Post a Comment