लोकलसह मुंबईतील कार्यालये टप्प्याटप्प्याने सुरू करा!



माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - मुंबईतील उपनगरीय रेल्वेसह टप्प्याटप्प्याने सरकारी व खासगी कार्यालये सुरू करा. त्यामुळे सामूहिक प्रतिकारशक्ती  मध्ये वाढ होईल परिणामी संसर्ग नियंत्रणात येऊन मुंबईचे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येईल, एवढेच नाही तर शाळा-महाविद्यालये सुरू करता येतील, असा सल्ला टाटा मूलभूत संशोधन संस्थेने (टीआयएफआर) मुंबई महापालिकेला एका अहवालाद्वारे दिला आहे.

कोरोना संसर्गामुळे मुंबईचे जनजीवन गेल्या सहा महिन्यांपासून विस्कळीत झाले आहे. सरकारी कार्यालयासह खासगी कार्यालये, उद्योगधंदे व अन्य व्यवहार कासवगतीने सुरू आहेत. मुंबईचे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी काय करता येईल, याचा अभ्यास करून तसा अहवाल टीआयएफआरच्या स्कूल ऑफ टेक्नोलॉजी अ‍ॅण्ड कॉम्प्युटर सायन्सचे अधिष्ठाता डॉ. संदीप जुनेजा, प्रल्हाद हर्ष व रामप्रसाद सप्तर्षी यांनी बनवून तो पालिकेला सादर केला. मुंबई पुन्हा सुरू करण्यासाठी कोविड-19 चा गणितीय दृष्टिकोनातून अभ्यास करून टीआयएफआरने हा अहवाल  बनवला आहे. मुंबई पूर्वपदावर येणे आवश्यक आहे. यासाठी प्रवासाचे मुख्य साधन असलेल्या रेल्वेसह कार्यालयांमध्ये मर्यादित कर्मचारी संख्या व अन्य वाहतूक सेवा सुरू करून सप्टेंबर मध्यापर्यंत 30 टक्के शहर पूर्वपदावर आणावे. ऑक्टोबरपर्यंत 50 टक्के व एक नोव्हेंबरला संपूर्ण मुंबई खुली करावी. 

डिसेंबर व जानेवारीपर्यंत मुंबईकरांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिपिंड (अन्टीबॉडिज) निर्माण होऊन सामूहिक प्रतिकारशक्ती वाढेल, अशी शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. गणेशोत्सवामुळे अनेक लोक घराबाहेर पडले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पुन्हा करोनाचे रुग्ण वाढत असल्याचे डॉ. जुनेजा यांनी सांगितले. सप्टेंबरमध्ये संपूर्ण शहर खुले केले तर, कोरना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू शकते, अशी भीतीही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. सामूहिक प्रतिकारशक्ती वाढल्यास डिसेंबर, जानेवारीत शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये 75 टक्के व अन्य ठिकाणी 50 टक्के प्रतिपिंड तयार होतील, असे या अहवालात म्हटले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post