माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूतला मृत्यूपूर्वी अमली पदार्थ उपलब्ध केल्याच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक या दोघांचा जामीन अर्ज शुक्रवारी फेटाळण्यात आला. विशेष न्यायालयाने रिया आणि शोविकसह अब्दुल बसित, झैद विलात्रा, दीपेश सावंत आणि सॅम्युअल मिरांडा यांचाही जामीन अर्ज फेटाळला आहे. रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी कोर्टाच्या निकालाची प्रत हाती आल्यानंतर पुढच्या आठवड्यात हायकोर्टात जाण्याबाबत निर्णय घेऊ असे सांगितले आहे.
रियाने अटकेनंतर दुस-यांदा जामिनासाठी अर्ज केला होता. अटक झाल्यानंतर न्यायालयाने तिला पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्या वेळी तिने जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने तो फेटाळला. रिया आणि शोविकच्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी झाली. त्या वेळी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जी. बी. गुरव यांनी चक्रवर्ती भावंडांची आणि पोलिसांची बाजू ऐकल्यावर सुनावणी शुक्रवारी ठेवली. या वेळी प्रकरणात अटकेत असलेल्या अन्य आरोपींच्या जामिनावरही सुनावणी झाली. या सगळ्यांच्या जामीन अर्जावर न्यायालयाने शुक्रवारी सुनावणी पूर्ण केली.
मुंबईत २८ ऑगस्टला तपासासाठी आलेल्या एनसीबीच्या विशेष पथकाने १० दिवसांत शोविक, मिरांडा, दीपेशसह आठ आरोपींना अटक करून अमली पदार्थ, रोकड आणि परकीय चलन जप्त केले. त्यानंतर एनसीबीकडून रियाच्या अटकेची मोठी कारवाई करण्यात आली. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक यांनी अनेकदा विविध व्यक्तींच्या माध्यमातून चरस, गांजा हे अमली पदार्थ मागवल्याची आणि विकत घेतल्याची कबुली अटक आरोपी दीपेश सावंत याने दिल्याचे एनसीबीने न्यायालयाला सांगितले होते.
भायखळा जेलमध्ये ज्या सेलमध्ये रियाला ठेवले गेले आहे ती सर्वसाधारण बॅरेकजवळ आहे. शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जीही या जेलमध्ये बंद आहे. रियाचा सेल इंद्राणी मुखर्जीजवळ आहे.
Post a Comment