‘दिल्ली दरबार’चे संस्थापक जाफर भाई यांचे कोरोनामुळे निधन


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - मुंबईतील दिल्ली दरबार या लोकप्रिय हॉटेलचे मालक जाफर गुलाम मन्सुरी यांचे कोरोनामुळे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते.

ते खवय्यांमध्ये जाफर भाई नावाने लोकप्रिय होते. मुंबईमध्ये मोगलाई पदार्थ मिळण्याचे प्रसिद्ध ठिकाण म्हणून दिल्ली दरबारला खवय्यांची कायमच पसंती मिळालेली आहे. जाफर भाईंना ‘बिर्याणी किंग ऑफ मुंबई’ या नावाने ओळखले जायचे.

कोरोनाचा संसर्ग झाल्याने २ सप्टेंबरपासून जाफर भाई यांना मुंबईथील ब्रीच कॅण्डी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. येथेच उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. मरिन लाइन्सजवळील बाबा कब्रिस्तानमध्ये त्यांचा दफनविधी पार पडला.

मूळचे अहमदाबादचे असणा-या जाफर भाई यांनी १९७३ साली दिल्ली दरबारची स्थापना केली. २००६ साली त्यांना आपल्या कौटुंबिक व्यवसायातून काढता पाय घेत स्वत:ची ‘जाफर भाईज दिल्ली दरबार’ ही स्वतंत्र फूडचेन सुरु केली. अगदी तरुण वयातच जाफर भाईंनी खाद्यपदार्थांसंदर्भातील व्यवसायामध्ये काम करण्यास सुरुवात केली. जाफर भाईंना खायला आणि खाऊ घालायला फार आवडायचे. वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांना परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यानंतर त्यांना वडिलोपार्जित कॅटरिंगच्या व्यवसायात लक्ष घातले.

१९७३ साली त्यांनी मुंबईतील ग्रँट रोड येथे त्यांनी दिल्ली दरबारची पहिली शाखा सुरु केली. ते स्वत: मालक असूनही हॉटेलच्या रोजच्या लहान लहान कामांमध्ये जातीने लक्ष घालायचे आणि अनेक गोष्टी त्यांनी स्वत: शिकून घेतल्या होत्या. त्यांच्या या बिर्याणीला मुंबईकरांचा चांगला प्रिसाद मिळाला आणि पाहता पाहता त्यांनी अनेक ठिकाणी दिल्ली दरबारच्या फ्रॅन्चायजीखाली हॉटेल सुरु केली. अगदी भारतातील अनेक शहरांपासून ते दुबईपर्यंत दिल्ली दरबारचा व्यवसाय पसरला आहे. मोगलाई पदार्थांबरोबरच बिर्याणीसाठी दिल्ली दराबर ओळखले जाते. याच चवीसाठी वेगवेगळ्या पुरस्कारांनी दिल्ली दरबारचा गौरव मागील अनेक वर्षांमध्ये झाला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post