स्व.बाळासाहेबांच्या नावाने आणखी एक योजना; 'या' आहेत प्रमुख तरतुदी




माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - राज्यात 'स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना' राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीस आर्थिक अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल त्याचप्रमाणे विहित पद्धतीने विमा कंपन्यांची निवड करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेचा महाराष्ट्रातील रस्त्यांवर होणाऱ्या अपघातातील जखमींना लाभ मिळणार आहे. ही व्यक्ती केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर अन्य कोणत्याही राज्यातील वा देशातील असली तरीही त्यांना योजनेंतर्गत योग्य ते वैद्यकीय उपचार देण्यात येणार आहेत. अपघातग्रस्तांना 'गोल्डन अवर' मध्ये तत्परतेने वैद्यकीय सेवा व आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेचा उपयोग होईल, असे नमूद करण्यात आले आहे. 

आजमितीस राज्य महामार्ग तसेच ग्रामीण रस्त्यांवर अपघातात दरवर्षी सरासरी ४० हजार व्यक्ती जखमी तर १३ हजार व्यक्ती मरण पावतात. अपघातानंतर वेळीच उपचार मिळाले तर जखमींचे प्राण वाचवणे शक्य झाले असते. ही बाब ध्यानात घेऊनच ठाकरे सरकारने दिवंगत बाळासाहेबांच्या नावाने ही नवीन योजना सुरू केली आहे. अपघातग्रस्तांसाठी ही योजना जीवनदायी ठरेल, असा सरकारला विश्वास आहे.

योजनेत नेमकं काय आहे?

> बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेत पहिल्या ७२ तासांसाठी जवळच्या रुग्णालयांमधून उपचार करण्यात येतील. 
> सुमारे ७४ उपचार पद्धतीतून ३० हजार रुपयांपर्यंतचा खर्च मोफत केला जाईल. 
> अतिदक्षता विभाग व वॉर्डामधील उपचार, अस्थिभंग तसेच रुग्णालयाच्या वास्तव्यातील भोजन याचा समावेश यात असेल. 
> औद्योगिक अपघात, दैनंदिन कामातील किंवा घरी घडलेले अपघात व रेल्वे अपघाताचा यात समावेश नाही.
> योजनेसंदर्भात कोणतीही तक्रार नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक देखील असेल. 
> राज्य आरोग्य हमी सोसायटी (वरळी) यांच्यामार्फत ही योजना कार्यान्वित होईल.

अपघातानंतर तातडीच्या उपचारांची हमी: आरोग्यमंत्री

बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरू होत असलेल्या या योजनेद्वारे अपघातानंर तातडीने उपचार मिळण्याची हमीच एकप्रकारे सरकार देत आहे. जखमींसाठी ही योजना जीवनदायी ठरेल. या योजनेंतर्गत जखमी व्यक्तीला ३० हजार रुपयांपर्यंत खर्च मिळेल वा रुग्णालयात मोफत उपचार मिळतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post