केमिकलयुक्त साबण आणि क्रीमऐवजी त्वचेसाठी वापरुन पाहा बेसन



माय अहमदनगर वेब टीम

हेल्थ डेस्क - बेसनपासून निरनिराळे चविष्ट पदार्थ तयार केले जातात. बेसनचे आरोग्यवर्धक तसंच सौंदर्यवर्धक फायदे देखील भरपूर आहेत. प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात आढळणाऱ्या बेसनचा कित्येक जणी आपल्या स्किन केअर रुटीनमध्येही समावेश करतात. चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी असेल किंवा मुरुमांचे डाग आणि अनावश्यक केसांची समस्या दूर करायची असेल तर यावर बेसनचं फेस पॅक रामबाण उपाय मानला जातो. 

वेगवेगळ्या फेस पॅकमध्ये तुम्ही बेसनचा उपयोग करू शकता. बेसनमधील पोषण तत्त्वांमुळे आपली त्वचा चमकदार होण्यास मदत मिळते. एवढंच नव्हे तर चेहऱ्यावरील मुरुम, मुरुमांचे डाग आणि अतिरिक्त तेलाची समस्याही दूर होते. त्वचेवर सकारात्मक परिणाम दिसण्यासाठी बेसनचा नेमका कशा पद्धतीने वापर केला पाहिजे? केवळ याची योग्य माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. बेसन फेस पॅकबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.


​बेसन त्वचेसाठी कसे ठरते लाभदायक?


चमकदार त्वचा, सुंदर स्किन टोन, डी- टॅनिंग, चेहऱ्यावरील अनावश्यक केसांची समस्या, मुरुमांपासून सुटका मिळवण्यासाठी बेसन लाभदायक आहे. त्वचेशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी बेसनचा फार पूर्वीपासून उपयोग केला जातोय. यातील पोषक घटकांमुळे आपल्या त्वचेवर जमा झालेले धूळ, मातीचे कण काढण्यासाठी मदत मिळते. बेसन फेस पॅकमुळे निस्तेज, निर्जीव त्वचेची समस्या कमी होते. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.


​मुरुम दूर करण्यासाठी

औषधी गुणधर्मांच्या मदतीने तुम्ही मुरुमांच्या समस्येपासून सुटका करून घेऊ शकता. बेसन फेस पॅकमुळे चेहऱ्यावरील मुरुम कमी होतीलच शिवाय मुरुमांच्या डागांपासूनही मुक्तता मिळू शकते.

सामग्री : कडुलिंबाचा पाला, बेसन आणि कोरफड 

फेस पॅक तयार करण्यासाठी कडुलिंबाच्या पाल्याची पेस्ट तयार करून घ्या. या पेस्टमध्ये बेसन आणि कोरफड जेल मिक्स करा. ही पेस्ट १५ मिनिटांसाठी मान आणि चेहऱ्यावर लावून ठेवा. पेस्ट सुकल्यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. आठवड्यातून एकदा हा उपाय नक्की करावा. कोरफड आणि कडुलिंबाच्या पाल्यामध्ये औषधी गुणधर्मांचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. यामुळे मुरुम कमी होण्यास मदत मिळते.

​कोरड्या त्वचेसाठी

दही आणि मधामध्ये जास्त प्रमाणात फॅटी अ‍ॅसिड असतात. हे अ‍ॅसिड आपल्या चेहऱ्यावर नैसर्गिक मॉइश्चराइझर प्रमाणे कार्य करते. फेस पॅक तयार करण्यासाठी एक मोठा चमचा बेसन घ्या. यामध्ये दही आणि मध देखील मिक्स करा. पेस्ट तयार झाल्यानंतर १५ मिनिटांसाठी आपल्या चेहऱ्यावर लावा. यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. थोड्या वेळाने त्वचेवर मॉइश्चराइझर देखील लावा. त्वचेवरील कोरडेपणा आणि डागांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी ही पेस्ट आठवड्यातून एकदा नक्की लावा.

​तेलकट त्वचेसाठी उपाय

आपल्या त्वचेवरील अतिरिक्त तेल आणि रोमछिद्रांमध्ये जमा झालेली दुर्गंध बाहेर काढण्यासाठी बेसन फेस पॅक एक नैसर्गिक आणि रामबाण उपाय आहे. यासाठी एका वाटीमध्ये बेसन आणि गुलाब पाणी एकत्र घ्या. त्यानंतर या पेस्टमध्ये एक चमचा टोमॅटोची पेस्ट मिक्स करा. हा लेप जवळपास २० मिनिटांसाठी चेहरा आणि मानेवर लावा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. गुलाब पाणी आपली त्वचा हायड्रेट ठेवते. तर बेसनमुळे तेलकट त्वचेची समस्या कमी होण्यास मदत मिळते. त्वचेवर अतिरिक्त प्रमाणात होणारा सीबमचा स्त्राव टोमॅटो पेस्टमुळे नियंत्रणात येतो.

​अनावश्यक केस काढण्यासाठी फेस पॅक

चेहऱ्यावरील अनावश्यक केस काढण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. यासाठी तुम्ही नैसर्गिक सामग्रींची मदत घेऊ शकता. बेसन, अंड्यातील पांढरा भाग, साखर आणि कॉन स्टार्च एकत्र घ्या. यापासून जाडसर पेस्ट तयार करा. सर्वप्रथम आपला चेहरा स्वच्छ धुऊन घ्या आणि त्यानंतर ही पेस्ट लावा. पेस्ट सुकल्यानंतर हातावर थोडेसे पाणी घ्या आणि आपल्या चेहऱ्याचा हलक्या हाताने मसाज करा. यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुऊन घ्या. सकारात्मक परिणामांसाठी हा उपाय नियमित करावा.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post