माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हरवले आहेत, त्यांना तातडीने शोधून द्या...अशी मागणी करणारे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष परेश पुरोहित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.
नगर शहर व जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार उडाला आहे, व पालकमंत्री मुश्रीफ हरवले आहेत. नगर शहर व जिल्ह्यात १०-१२ दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्याची मागणी सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधींची आहे, पण मुश्रीफ यांना सर्व नियंत्रणात असल्याचे वाटते, असे पुरोहित यांनी या पत्रत म्हटले आहे.
नगर जिल्ह्यात रोज ८०० कोरोना रुग्ण सापडत आहेत, अमरधाममध्ये मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा मिळत नाही, एका दिवसात तब्बल २२ अंत्यविधी होण्याची घटना घडली आहे, दुसरीकडे सिव्हीलमध्ये कोरोना स्वॅब घेण्याचे कीट संपल्याने दोन-तीन दिवस हे काम बंद होते, असे स्पष्ट करून पुढे म्हटले आहे की, पालकमंत्री मुश्रीफ फक्त बैठकांसाठीच नगरला येतात. त्यांनी सिव्हील हॉस्पिटल वा अमरधामला अजूनही भेट दिलेली नाही. जिल्ह्यातील कोरोना मृत्यूचा आकडा बाराशेच्या पुढे गेला असावा, पण प्रशासनाकडून खोटे आकडे सांगितले जात असावेत. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मुश्रीफ हरवले असल्याने त्यांना तातडीने शोधून द्यावे, अशी मागणीही पुरोहित यांनी मुख्यमंत्री ठाकरेंकडे केली आहे.
Post a Comment