माय अहमदनगर वेब टीम
पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) स्पर्धा परीक्षांसाठी नवीन गुणपद्धती जाहीर केली आहे. एमपीएससीकडून घेतल्या जाणार्या विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांकरिता चार चुकीच्या उत्तरांबद्दल एक गुण वजा करण्याची नकारात्मक गुणांची पद्धत होती. त्यात आता बदल केला असून, यापुढे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 25 टक्के किंवा 1/4 गुण वजा करण्यात येणार आहेत. ही पद्धत यापुढील परीक्षांपासून लागू होणार आहे.
एमपीएससीने 2009 साली स्पर्धा परीक्षांच्या निकालासाठी नकारात्मक गुणपद्धती (निगेटिव्ह मार्किंग) सुरू केली. यामध्ये चार प्रश्?नांची उत्तरे चुकली, तर एक गुण वजा करण्यात येत होता. आता नवीन नियमानुसार प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 25 टक्के किंवा 1/4 एवढे गुण वजा करण्यात येणार आहेत. एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तरामधून 25 टक्के किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील. वरील नियम लागू करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकांत आली तरीही ती अपूर्णांकांतच राहील.
एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल, तर अशा प्रकारची नकारात्मक गुणांची पद्धत लागू होणार नाही. एमपीएससीने जाहीर केलेली नवीन गुणांची पद्धत सर्व स्पर्धा परीक्षा, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा तसेच चाळणी परीक्षांकरिता लागू राहणार आहे.
Post a Comment