कंगनाची शिवसेनेवर आगपाखड सुरूच! बाळासाहेबांची मुलाखत ‘शेअर’ करत लगावला टोला



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेले शाब्दिक युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही. एकीकडे शिवसेनेच्या नेत्यांनी कंगनाबाबत बोलण्याचे टाळण्यास सुरुवाच केली असली तरी कंगना राणौतकडून याविषयी ट्विटरवरून टिव टिव सुरूच आहे. दरम्यान, शुक्रवारी कंगनाने शिवसेनेवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ शेअर करत कंगनाने शिवसेनेच्या सध्याच्या भूमिकेवर निशाणा साधला आहे.

महान नेते असलेले बाळासाहेब ठाकरे हे माझे सर्वात आवडीच्या नेत्यांपैकी आणि आदर्शांपैकी एक होते. कधीतरी शिवसेना गटातटाच्या राजकारणात सामील होईल आणि काँग्रेस बनेल, अशी भीती त्यांना वाटायची. आता त्यांच्या पक्षाची सध्याची पाहून त्यांची भावना काय असली असती, अशी विचारणा कंगनाने केली आहे.

तोडलेले कार्यालय दुरूस्त करणार नाही…

दरम्यान, कंगनाने याआधीच्या ट्विटमध्ये कंगनाने आपण मुंबई महापालिकेने तोडलेले कार्यालय नव्याने बांधणार नसल्याचे सांगितले होते. मी याच वर्षी १५ जानेवारीला हे कार्यालय सुरू केले होते. मात्र काही दिवसांतच कोरोना आला. त्यामुळे इतरांप्रमाणे मीसुद्धा तेव्हापासून काम केलेले नाही. आता नव्याने ऑफिस उभे करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे मी माझ्या तुटलेल्या ऑफिसमधूनच काम करणार आहे. तसेच एका महिलेने जगाशी टक्कर घेतल्याची आठवण म्हणून जपून ठेवणार आहे.

कंगनाने गुरुवारीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मुंबई महापालिका आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर आगपाखड केली. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या विचारधारेवर शिवसेना उभी केली, तीच विचारधारा सत्तेसाठी विकून शिवसेनेची सोनिया सेना बनली आहे, अशा शब्दांत कंगनाने शाब्दिक फटकारे लगावले. मात्र त्याला शिवसेनेकडून तिला काहीच प्रत्युत्तर देण्यात आले नाही.

कंगनाच्या या पोस्टवर विविध प्रकारच्या कमेंट्स येत आहेत. अनेकांनी कंगनाचे कौतुक केले आहे तर अनेकांनी कंगनाच्या या ट्विटला ड्रामा म्हटले आहे.

शिवसेना भेकड; कंगनाच्या आईचाही हल्लाबोल

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या जीवाला धोका असल्याचा दावा कंगनाची आई आशा रानौत यांनी केला आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना आशा राणौत यांनी उद्धव ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्या म्हणाल्या, शिवसेना भेकड अन् घाबरट आहे. आशा राणौत म्हणाल्या की, संपूर्ण भारत माझ्या मुलीसोबत आहे. असा अन्याय का?, ही बाळासाहेब ठाकरे यांची सेना नाही? ते भेकड, भ्याड आणि घाबरट आहेत. आम्ही त्यांच्यासारखे वंशवादी नाही. कंगनाने गेल्या १५ वर्षांपासून कष्टाने पैसे कमावले आहेत. हे कसले सरकार आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे आभार, अन्यथा माझ्या मुलीचे समर्थन कोणी केले असते, असेही कंगनाची आई म्हणाली आहे.

ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात आता कंगनाचीही चौकशी

मुंबईची पाकव्याप्त काश्मिरशी तुलना आणि ऑफिसमधील अनधिकृत बांधकामावर हातोडा पडल्यानंतर अभिनेत्री कंगना रनौतच्या अडचणींत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कंगनाच्या ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांना दिले आहेत.

कंगना ड्रग्ज घेत असल्याचा दावा दिग्गज अभिनेता शेखर सुमनचा मुलगा, अभिनेता अध्ययन सुमन याने एका मुलाखतीत केला होता. त्याबाबतची चौकशी मुंबई पोलीस करतील, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. अध्ययन सुमनने चार वर्षांपूर्वी दिलेली एक मुलाखत पुन्हा व्हायरल झाली आहे. त्यात कंगनाने आपल्याला कोकेन घेण्याचा आग्रह केल्याचा दावा अध्ययनने केला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post