ग्लोबल इकोनॉमिक फ्रीडम इंडेक्समध्ये भारत २६ वरुन १०५ व्या नंबरवर; तळामध्ये फक्त आफ्रिकन देश!

 


माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली - जागतिक आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकात (ग्लोबल इकोनॉमिक फ्रीडम इंडेक्स) भारत २६ व्या स्थानावरून तब्बल १०५ व्या स्थानापर्यंत घसरला आहे. देशातील आर्थिक, व्यापारी घडामोडीतील स्वातंत्र्य कमी झाल्याचे हे द्योतक असल्याचे ताज्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

कॅनडाच्या फ्रेजर इन्स्टिट्यूटने भारतातील सेंटर फॉर सिव्हिल सोसायटीच्या सहकार्याने हा अहवाल तयार केला आहे. वर्ष २०१९ मध्ये भारत या यादीत ७९ व्या क्रमांकावर होता. जागतिक आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकात हाँगकाँग आणि सिंगापूर क्रमश: पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. चीन या यादीत १२४ व्या स्थानी आहे. पहिल्या १० देशात जे देश सामील आहेत त्यात न्यूझीलंड, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, मॉरीशस, जॉर्जिया, कॅनडा आणि आयर्लंड यांचा समावेश आहे. 

अन्य प्रमुख देशांमध्ये जपान २० व्या क्रमांकावर असून जर्मनी २१ व्या, इटली ५१व्या, फ्रान्स ५८ व्या, रशिया ८९ व्या क्रमांकावर आहे. सर्वांत तळात असलेल्या देशांमध्ये प्रामुख्याने आफ्रिकन देश आहेत. तळात असलेल्या देशात कांगो, झिम्बाब्वे, अल्जेरिया, इराण, व्हेनेझुएला यांचा समावेश आहे. गेल्या वर्षभरात अर्थव्यवस्थेचा आकार, न्यायिक प्रणाली आणि संपत्तीचा अधिकार, जागतिक स्तरावर व्यापाराचे स्वातंत्र्य, वित्त, श्रम आणि व्यवसायाची नियमावली आदी बाबतीत भारताची स्थिती खराब झाली आहे. अहवाल बनविताना १६२ देशांचा विचार करण्यात आला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post