मॉस्को/ पुणे : वृत्तसंस्था - भारतीय औषध कंपनी ‘डॉ. रेड्डी’ला रशियाकडून ‘स्पुत्निक व्ही व्हॅक्सिनर’ या कोरोनावरील लसीचे 10 कोटी डोस पुरविण्यात येणार आहेत. ‘रशियन गुंतवणूक निधी’ आणि डॉ. रेड्डी लॅबोरटरीज्च्या ‘सॉवरेल वेल्थ फंड’कडून बुधवारी ही माहिती देण्यात आली. रशियातील गेमेलिया रिसर्च इन्स्टिट्यूटने ही लस तयार केलेली असून, या लसीची चाचणी भारतातही घेण्यात येणार आहे.
रशियातील अंतिम चाचणीनंतर भारतात या लसीची नोंदणी केली जाईल आणि त्यानंतर येथेही चाचणीची प्रक्रिया पार पडेल. जगभरातील 40 शास्त्रज्ञांनी रशियन लस निर्मिती संस्थेला पत्र लिहिले असून, निर्मिताचा मूळ डेटा मागविला आहे. रशियाने हा डेटा भारताला आधीच पाठविलेला आहे.
चाचणीच्या यापूर्वीच्या सर्व टप्प्यांत लस परिणामकारक व निर्धोक असल्याचे सिद्ध झाल्याचा दावा गेमेलिया रिसर्च इन्स्टिट्यूटने केला आहे.
तीन देशांमध्ये लस वापर सुरू चीन आणि रशियानंतर संयुक्त अरब अमिरातीनेही आणीबाणीच्या परिस्थितीत लसीचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. चिनी कंपनी सिनोफार्मने बनविलेली लस चाचणीच्या तिसर्या टप्प्यात असली तरी रुग्णांवर तिचा वापरही सुरू झाला आहे.
‘ऑक्सफर्ड’ लस चाचणीस परवानगी
यादरम्यान भारताने दोन्ही स्वदेशी लसींची पहिल्या टप्प्यातील चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केलेली आहे. दुसर्या टप्प्यातील चाचणीसाठी भारतातील या दोन्ही लसींकरिता स्वयंसेवकांच्या निवडीची प्रक्रियाही पार पडलेली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला ऑक्सफर्ड/अॅस्ट्राजेनेकाच्या कोव्हिड-19 कोव्हिशिल्ड लसीची चाचणी पुन्हा सुरू करण्याची परवानगीही अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
अमेरिकेत चाचणी अडकलेलीच
इंग्लंडमध्येही कोव्हिशिल्डची चाचणी पूर्ववत सुरू झाली आहे. अमेरिकेत मात्र अन्न व औषध प्रशासनाने याबाबत निर्णय अद्याप घेतलेला नाही. दुसरीकडे अमेरिकेतील राष्ट्रीय आरोग्य संस्थेने चाचण्या थांबविण्याच्या कारणांची चौकशी सुरू केली आहे.
इंग्लंडमध्ये या लसीच्या दुसर्या व तिसर्या चाचणीदरम्यान एका महिलेची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर भारतासह जगभरात सुरू असलेल्या या लसीच्या चाचण्या स्थगित करण्यात आल्या होत्या. तज्ज्ञांची स्वतंत्र समिती तसेच इंग्लंडमधील औषध नियामकांकडून चौकशीनंतर चाचण्यांना पूर्ववत परवानगी देण्यात आली.ज्या महिलेची प्रकृती बिघडली होती, ती आता पूर्णपणे बरी झालेली आहे.
सीरममध्ये आता 2 अब्ज डोस
जगातील सर्वांत मोठ्या लस उत्पादक सीरमकडून (भारत) अमेरिकेतील नोवाव्हॅक्स कंपनीने एक अब्ज डोस बनविण्याचा करार केला होता, तो आता दुपटीचा झाला आहे. सीरममध्ये आता 2 अब्ज डोस तयार होणार आहेत. सीरमची तिसर्या टप्प्यातील चाचणी ऑक्टोबरमध्ये होईल.
भारतीय लसींची दुसर्या टप्प्यासाठी स्वयंसेवक नियुक्ती
भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन तसेच झायडस कॅडिलाची कँडिडेट या लसींनी चाचणीचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. झायडस कॅडिलाने दुसर्या टप्प्यासाठी नियुक्त्या पूर्ण केल्या आहेत. 28 दिवसांच्या अंतराने 3 डोस देण्यात येतील. भारत बायोटेकनेही दुसर्या टप्प्यासाठी नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. या टप्प्यात स्वयंसेवकांना प्रत्येकी 2 डोस देण्यात येतील. सीरम इन्स्टिट्यूटने दुसर्या टप्प्यातील चाचणी पूर्ण केली आहे. 7 दिवसांच्या अवकाशानंतर आता 14 ठिकाणी 1,500 स्वयंसेवकांवर तिसर्या टप्प्याची चाचणी सुरू होईल.
Post a Comment