पुणे - पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) येथील लर्निंग लायसन्स विभागाचे कामकाज सकाळी साडेसात वाजतापासून सुरू केले जाणार आहे. लायसन्सचा कोटा वाढवल्याने गर्दी होवू नये, यासाठी खबरदारी म्हणून कामाचे तास वाढविण्यात आले आहेत.
परिवहन आयुक्तालयाच्या निर्देशानुसार आरटीओ कार्यालयाने लायसन्सचे वेटिंग कमी करण्यासाठी कोटा वाढवण्याची सूचना केली होती. त्यानुसार लर्निंग लायसन्सचा कोटा नुकताच वाढवण्यात आला आहे. त्यांनतर आरटीओ मध्ये काही प्रमाणात गर्दी वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर आरटीओ प्रशासनाने सकाळी साडेसात ते सायंकाळी सहा या वेळेत काम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सुधारित ऑनलाइन अपॉइंटमेंट कोटा ऑनलाइन संगणक प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली.
बदललेल्या वेळेनुसार दररोज प्रत्येकी दीड तासांचे एकूण सर स्लॉट उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रत्येक स्लॉटमध्ये १०० उमेदवार याप्रमाणे प्रतिदिन ७०० उमेदवारांच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत.
दरम्यान, लर्निंग लायसन्स विभागाची कामकाजाची वेळ वाढवण्यात आल्याने त्याचा मोठा दिलासा संबंधित उमेदवारांना मिळणार आहे. सकाळी साडेसात वाजताच कार्यालय सुरू होणार असल्याने गर्दी टाळणे शक्य होणार आहे. करोनाचा प्रादुर्भाव पाहता या निर्णयाचे लर्निंग लायसन्ससाठी इच्छूक असणाऱ्यांकडून स्वागत होत आहे.
Post a Comment