पंढरपूर शहरात शिरले पाणी; नदीकाठच्या 55 गावांना पूराचा धोका

 


माय अहमदनगर वेब टीम

पंढरपूर - गेल्या चार दिवसापासून सुरु असलेल्या परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असून उजनी धरणातून 2 लाख 32 हजार तर वीर धरणातून 53 हजार क्युसेकचा विसर्ग करण्यात येत असल्याने तसेच स्थानिक ओढे, नाल्यांचे 40 हजार क्युसेक पाणी भीमा नदीत मिसळत असल्याने पंढरपूर येथे 2 लाख 70 हजार क्यसेकने वाहत असल्याने भीमा (चंद्रभागा) नदीला महापूर आला आहे. महापूराचे पाणी शहरात घुसले असून शहरातील 400 कुटंबातील 1657 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. तर  नदीकाठच्या 55 गावातील 6 हजार 748 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

उजनीतून व वीर धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग पंढरपूर येथे सायंकाळी 2 लाख 70 हजार क्युसेकने वाहत आहे. या पाण्यामुळे पंढरपूर शहरातील व्यासनारायण झोपडपट्टी, आंबेडकर नगर, अंबाबाई पटांगण, लखुबाई मंदिर, रोहिदास चौक, दत्तघाट परिसर तसेच घोंगडे गल्लीत पाणी शिरले आहे.

या भागातील 400 कुटुंबातील 1657 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. स्थलांतरीत केलेल्या नागरिकाना केंद्रे महाराज मठ, सारडा भवन, तनपुरे महाराज मठ, लोकमान्य शाळा, चैतन्य महाराज मठ, गंगागिरी महाराज मठ, पर्यटक निवास येथे सुरक्षित ठेवण्यात आले आहे. तर यांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमार्फत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

शहराबरोबर नदीकाठच्या व नऊ मंडलातील सुमारे 55 गावांना पुराचा फटका बसला आहे. नदीकाठच्या गावातील 1687 कुटुंबांतील 6 हजार 748 नागरिकांना जि.प. शाळा, समाज मंदिरे, मंदिरे आदी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

पंढरपूर शहराला जोडणार्‍या पूलांवर भीमा नदीच्या पूराचे पाणी गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता आल्याने सरगम चौकाकडील अहिल्या पुलावरील वाहतुक बंद करण्यात आली आहे. तर शेवटची आशा म्हणून राहिलेला नवीन पूलही पाण्याखाली गेल्याने याही पूलावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच गोपाळपूर येथील पूलही पाण्याखाली गेला असल्याने पंढरपूर मंगळवेढा वाहतूक बंद करण्यात आली आहे.  बुधवारी रात्री पंढरपूर - भंडीशेगाव पुणे, पंढरपूर -सुपली- सातारा पूलावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे पंढरपूरला जोडणार्‍या पंढरपूर ते सांगोला हाच एकमेव मार्ग सुरु आहे. मात्र तोही चंद्रभागेची (भीमा) पाणी पातळी वाढली की केंद्रे महाराज मठ ते शनैश्‍वर मंदिर  रस्त्यावर पाणी येण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवली जात आहे.

प्रशासनाकडून नागरिकांच्या सुरक्षितेतेसाठी एन.डी.आर.एफ.ची टिम बोलावण्यात आली असून त्यांच्यामार्फत मदत व बचाव कार्य सुरु आहे. त्याचबरोबर प्रांताधिकारी सचिन ढोले व महसूल विभागाची टिम तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम व त्यांची टिम तसेच बीडीओ रविकिरण घोडके व त्यांची टिम मदत व बचाव कार्य करीत आहे.

दरम्यान नदीला आलेल्या पुराचे पाणी नदीकाठच्या पिकात विशेषत: ऊस पिकात शिरले असल्याने लाखो हेक्टरवरचा ऊस पाण्याखाली गेला आहे. तर ग्रामीण भागातही पाऊस सुरु असल्याने फळबागा, शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

8 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले

शहरातील अंबाबाई पटांगण, व्यासनारायण झोपडपट्टी परिसर, लखुबाई मंदीर परिसर येथील 354 कुटुंबातील 1 हजार 657 नागरिकांना तर तालुक्यातील नऊ मंडलातील नदी काठच्या गावांतील तसेच पुराचा फटका बसलेल्या 1 हजार 687 कुटुंबातील 6 हजार 748 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले, असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगीतले.

पंढरपूरला जोडणारे हे मार्ग झाले बंद 

पंढरपूर शहराला जोडणारे पंढरपूर मंगळवेढा, पंढरपूर मोहोळ-सोलापूर, पंढरपूर सातारा, पंढरपूर -भंडीशेगाव-पुणे, हे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. चंद्रभागेवरील अहिल्या पूल व नवीन पुलावरही पाणी आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post